औरंगाबाद, पुढारी ऑनलाईन : "मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. मी फक्त मशिदीवरील भोंग्यांना पर्याय दिला आहे. तुम्ही भोंगे काढले नाही तर हनुमान चालिसा लावू, जर भोंग्यांना धार्मिक रंग दिला, तर आम्हीदेखील तसेच उत्तर देऊ. आमची इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. सगळेच भोंगे बेकायदेशीर आहेत, हे लक्षात ठेवा. युपीमध्ये भोंगे उतवले जातात, तर महाराष्ट्रात का नाही? ४ तारखेनंतर आम्ही अजिबात ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदीवर भोंगे लागतील, तिथे हनुमान दुप्पट आवाजाने चालिसा लावणार.", असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. ते बोलत असताना मशिदीतील अजान सुरू झाले. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, "हे अजान तातडीने बंद होणार नसतील, आम्ही शांत बसणार नाही. या लोकांची थोबाडं बंद करा. महाराष्ट्रातील जनतेला मी सांगतो की, जर भोंगे उतरले गेले नाही, तर अजिबात शांत बसू नका. ३ तारखेपर्यंत भोंगे झाले नाहीत, तर थेट ४ तारखेपासून हनुमान चालिसा लावा. हवंतर परवानगी घ्या. पण दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा. प्रेमानं एकदा समजावून सांगा, अनथ्या एकदा होऊन जाऊन द्या. हे सरळ सांगून ऐकत नसतील, तर एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे एकदा दाखवून देऊ. अभी नही तो कभी नही", असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
"आम्ही फक्त महापुरुषांचा जयंती-पुण्यतिथी साजरा करतो. शिवराय ही एक व्यक्ती नाही, विचार आहे. ते औरंगजेबालाही कळले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मोगलांचे साम्राज्य उद्ध्वस्त केलं. आज त्या महाराष्ट्राची अवस्था काय झाली आहे? रोजच्या रोज महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. महाराष्ट्रा महाराष्ट्रातील नेते काहीही बरळत आहेत. शरद पवार साहेब तुम्ही जातीजातीत दुही माजवताय. पवारांचे सगळे व्हिडिओ पहा, त्यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. तुम्ही नास्तीक आहात, असे बोललो तर तुम्हाला झोंबलं. तुमची कन्याच लोकसभेत बोलली आहे", अशी थेट टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, "दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादीनंतर सुरू झाला. जात ही पहिली होतीच, पण त्यात वाद राष्ट्रवादीनंतर सुरू झाला. आम्हाला जातीपातीशी घेणं-देणं नाही. मी जात बघून पुस्तकं वाचत नाही. पवारांनी प्रबोधनकारांची पुस्तकं वाचावी. मी माझ्या आजोबांची सर्व पुस्तकं वाचली आहे. पवारांनी 'उठ मराठ्या उठ' हे पुस्तक वाचावं. केंद्रात तुमची मंत्री असताना जेम्स लेनला का फरफटत आणलं नाहीत? तुम्ही पुरंदरेशी का चर्चा केली नाहीत? तुम्ही लोकांना का विष पाजलंत?", असे सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहे.
"माझ्या इथून पुढच्या प्रत्येक सभा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. सभांना आडकाठी काहीच होणार नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहणार आहे का? त्यामुळे संभाजीनगरपुरता मर्यादित नाही. जे इतिहास विसरले, त्यांचा भूगोल सटकला. मला सगळ्या प्रश्नांची कल्पना आहे. संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मनसेच्या सभेत कुणी वेडवाकडं करण्याचा प्रयत्न कराल, तर चौरंग करून घरी पाठवेन", अशी खुली धमकी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सभेत गोंधळ घालणाऱ्यांना दिली.