नांदेड : ४ दिवसानंतर शेतात आढळला 'त्या' बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह   | पुढारी

नांदेड : ४ दिवसानंतर शेतात आढळला 'त्या' बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह  

शंकरनगर, पुढारी वृत्तसेवा : अटकळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील एक व्यक्ती मागील ४-५ दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. नांदेड-देगलूर राज्य महामार्गापासून काही अंतरावर केरूर शेतात (३० मार्च) आज सकाळी त्या व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, अटकळीतील भगवान नारायण नवघरे (वय-३८) नावाची व्यक्ती ४-५ दिवसांपासून बेपत्ता झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास नांदेड-देगलूर राज्य महामार्गापासून काही अंतरावर केरूर शिवारात त्या व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विजय जाधव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी शोधकार्य सुरु केले. मृतदेह सडल्यामुळे त्याची ओळख पटविणे अवघड होते. शेवटी ४-५ तासांनंतर त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

अटकळी येथील ही व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची रामतीर्थ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख लतीफ, इंगळे पाटील हे करत आहेत. परंतु, त्याचा मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Back to top button