कोल्हापूर : हरकतींमुळे दहा हजार मतदारांची हेराफेरी उघड

हेराफेरी उघड www.pudharinews.
हेराफेरी उघड www.pudharinews.

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. परंतु, मोठ्या प्रमाणात एका प्रभागातील मतदारांची दुसर्‍याच प्रभागात नोंद अशा गंभीर चुका झाल्या आहेत. पतीची नोंद एका प्रभागात तर पत्नी दुसर्‍याच प्रभागाची मतदार अशा चुकांचा त्यात समावेश होता. बीएलओवर जबाबदारी ढकलून प्रशासन रिकामे झाले. मात्र, इच्छुकांनी त्याविरुद्ध हरकतींच्या माध्यमातून आवाज उठवला. तब्बल 308 हरकती दाखल केल्या. या हरकतींमुळे तब्बल 9 ते 10 हजार मतदारांची हेराफेरी उघड झाली आहे. बहुतांश हरकती निकाली निघाल्या असून संबंधितांची नोंद त्या-त्या प्रभागात करण्यात आली आहे. शनिवारी अंतिम मतदार याद्या नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने होत आहे. कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या 92 झाली आहे. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 आणि 2 नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रशासनाने प्रभाग रचना प्रसिद्ध केली असून आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप मतदार याद्यांचे काम सुरू करण्यात आले होते. 23 जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. 1 जुलैपर्यंत हरकती दाखल करून 9 जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करायच्या होत्या. परंतु, हरकती दाखल करण्यास कमी कालावधी असल्याने तो वाढवून मिळावा, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली.

त्यानुसार 3 जुलैपर्यंत हरकतींचा कालावधी वाढविण्यात आला. त्याअंतर्गत तब्बल 308 हरकती दाखल झाल्या. 9 जुलैऐवजी 16 जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. या कालावधीत हरकतीनुसार बीएलओ आणि महापालिका अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन त्या निकाली काढल्या. संबंधित मतदार, साक्षीदार म्हणून शेजारी, जिओ टॅग, आधार कार्ड आदीसह सविस्तर पंचनामा करून अंतिम अहवाल तयार करण्यात आले. अशाप्रकारे सर्व हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे. गेले काही दिवस महापालिकेचे सुमारे 550 अधिकारी-कर्मचारी रात्रं-दिवस त्यासाठी युद्धपातळीवर काम करत होते.

चार विभागीय कार्यालयांत याद्या…

गांधी मैदान विभागीय कार्यालय (क्र. 1), छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 2), राजारामपुरी विभागीय कार्यालय (क्र. 3) आणि छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 4) या महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांसह ताराबाई पार्कातील निवडणूक कार्यालयात अंतिम मतदार याद्या नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याबरोबरच महापालिकेच्या वेबसाईटवरही याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news