

कोल्हापूर ः डॅनियल काळे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि बेफाम वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपुरे पडणारे रस्ते, सदोष बांधणी, सेवा मार्गांचा अभाव, अपुरी आणि अर्धवट स्थितीतील कामे, धोकादायक वळणे, नागरिकांना रस्ते ओलांडण्यासाठी व्यवस्थेचा अभाव, रस्त्यावर फिरणारी जनावरे, यामुळे रस्ते 'मृत्यूचा महामार्ग' बनले आहेत. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने ही महामार्गांची व्यवस्था ठळकपणे समोर आली. या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पुणे मार्गावर प्रकाशझोत…
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही सातारा-कागल मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या आठ महिन्यांच्या काळात या मार्गावर 188 अपघात झाले. अपघातांत 35 जणांना प्राण गमवावे लागले, तर 250 जण गंभीर जखमी झाले. महामार्गावर जेथे मोठी गावे जोडली गेली आहेत, अशा अनेक ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग नसल्याने वर्दळीच्या महामार्गावरूनच रस्ता ओलांडावा लागत असल्याने अपघातांचे हे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष आहे. याशिवाय दुभाजकांचा उडालेला रंग, महामार्गावर रस्ते क्रॉसिंगच्या ठिकाणी पांढरे पट्टे नसणे, महामार्गावर चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, दुभाजकांचे अस्तित्व न दिसणे, अशी अपघातांची वेगवेगळी कारणे आहेत.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे 2000 साली चौपदरीकरण झाले. चौपदरीकरणानंतर महामार्गावर वाहनांचा वेग वाढत गेल्याने अपघातांचे प्रमाणही त्यातुलनेत वाढतच गेले.चौपदरीकरणानंतर हा मार्ग सुरक्षित होईल, असे वाटत असतानाच वाढत्या वाहनसंख्येबरोबरच वाहनांचा वेगही वाढल्याने अनेक अपघात होत गेले. या अपघातांमध्ये बरेचदा वाहने रस्ते दुभाजकांवर गेल्याने अपघात झाले आहेत. महामार्ग झाला असला, तरी त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याने बरेच अपघात होतात.
सातारा-कागल या महामार्गाच्या अंतरापैकी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत एकूण 15 'ब्लॅक स्पॉट' आहेत. यामध्ये कागल-मुरगूड नाका, कागल लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव फाटा, मयूर पेट्रोल पंप, गोकुळ शिरगाव, सांगली फाटा, शिरोली, नागाव फाटा, टोप, कासारवाडी फाटा, टोप मुख्य गावातील वळण, अंबप फाटा, वाठार पूल, वाठार-वडगाव रोड, वडगाव फाटा हे 'ब्लॅक स्पॉट' आहेत.
महामार्गावर कासारवाडी फाटा, टोप ही ठिकाणे म्हणजे मृत्यूचा सापळाच आहेत. येथे एक तर धोकादायक वळण आहे. त्याचबरोबर कासारवाडीकडून शिरोलीकडे आणि टोपकडून कासारवाडीकडे जाणारी वाहने महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतात. याचवेळी महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने ये-जा करतच असतात. विशेष म्हणजे, येथे कासारवाडीकडून शिये खाणीकडे जाणारी अवजड वाहने महामार्गावरून चुकीच्या दिशेने जात असतात. त्यामुळे महामार्गावर टोप गावातून जाताना फार मोठी जोखीम घेऊनच वाहनधारकांना प्रवास करावा लागतो.
महामार्गावरील सेवा रस्त्यांचा वापर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठीच केला जात असल्याने सेवा रस्त्यांचा वापर वाहतुकीसाठी फारसा होताना दिसत नाही. त्यामुळे सेवा रस्त्यावरून जी वाहतूक होणे अपेक्षित आहे, ती वाहतूक महामार्गावरूनच होते. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढते. महाराष्ट्राच्या हद्दीत महामार्गालगतचे जे सेवा रस्ते आहेत ते रस्ते अखंड नाहीत. मध्ये मध्ये हे रस्ते तुटलेले आहेत. त्यामुळे या सेवा रस्त्यांचा अपेक्षित वापर होत नाही.