कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी जिल्ह्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणारे सुमारे 1 लाख 85 हजार खातेदार शेतकरी पात्र ठरत आहेत. या शेतकर्यांच्या बँक खात्यांवर 50 हजारापंर्यंतची रक्कम जमा करण्याचे आदेश बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना सुमारे 550 कोटी रुपये मिळणार आहेत. कागल, शिरोळ आणि करवीर तालुक्यांतील शेतकर्यांची संख्या सर्वाधिक असल्याने तेथे इतरांच्या तुलनेत जास्त अनुदान मिळणार आहे.
नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षांतील शेतकर्यांची माहिती शासनाने मागवली होती. जिल्हा बँकेने विकास संस्थांच्या माध्यमातून 2017 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीतील माहिती संकलित करून ती सहकार विभागाकडे सादर केली होती.
ही माहिती तातडीने सहकार आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यामुळे ही प्रोत्साहनची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यांवर कधी जमा होणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर बुधवारी मुंबईत झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रोत्साहन अनुदान योजनेतील रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिरोळइतकीच रक्कम करवीरला मिळणार
शिरोळ तालुक्यात जमिनीचे क्षेत्र मोठे असल्याने शेतकर्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत करवीर तालुक्यात अल्प, अत्यल्प भूधारक शेतकर्यांची संख्या अधिक आहे. मात्र, प्रोत्साहन योजनेतून शिरोळ तालुक्याएवढीच रक्कम करवीर तालुक्याला मिळेल, असे चित्र आहे.