जोतिबा डोंगर परिसरात चोरटी वृक्षतोड

जोतिबा डोंगर परिसरात चोरटी वृक्षतोड
जोतिबा डोंगर परिसरात चोरटी वृक्षतोड

कोडोली : पुढारी वृतसेवा जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या माले, पडवळवाडी, दाणेवाडी, जाफळे, जाखले, केखले, गिरोली या परिसरात प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. याकडे वन खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव— संताप व्यक्त होत आहे. माले, जाखले, केखले, दाणेवाडी, पडवळवाडी जाफळे व गिरोली परिसरातील शासकीय जमिनीमध्ये शासनाने वनीकरण केले आहे. 20-25 वर्षांची सागवान, निलगिरी, ऑस्ट्रेलियन सुबाभूळ, आंबा इत्यादी झाडे या वनीकरणामध्ये चांगली वाढलेली आहेत.

तथापि, अज्ञात चोरट्यांकडून गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात या वृक्षाची चोरटी तोड झालेली आहे. या झाडांचा उपयोग इमारतीकरिता होत असल्याने कमाईचे साधन असल्याने चोरट्यांकडून येथील वृक्षांची बेसुमार तोड झाली आहे. वीस-पंचवीस वर्षे जोपासलेल्या या वृक्षसंपदेची तोड होत असताना वन विभागाचे कर्मचारी डोळे मिटून गप्प का आहेत, असा संतप्त सवाल येथील निसर्गप्रेमींमधून होत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी बेसुमार वृक्षतोड अगदी सहजपणे दिसून येते. त्यामुळे हा परिसर लवकरच उजाड होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

परिसरात बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर असल्याने या परिसरातील वृक्षांनाही अत्यंत महत्त्व आहे. एकीकडे शासनाकडून वृक्षारोपण केले जात आहे, तर दुसर्‍या बाजूने अशी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे वनीकरणाचे प्रयत्न कुचकामी ठरत आहे, असे मत या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वृक्षतोडीचे असे प्रकार थांबवले नाही तर याबाबत वन खात्याविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news