चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी सुशांत शेलार

चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी सुशांत शेलार
चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी सुशांत शेलार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव दाखल करून बुधवारी नूतन अध्यक्ष म्हणून सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली. यापूर्वी कार्यकारिणी बैठकीत मांडलेला ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष धनाजी यमकर होते. कोल्हापुरात चित्रपट महामंडळाची कार्यकारिणी वीस महिन्यांनी घेण्यात आली. यापूर्वी अनेक सदस्यांनी कार्यकारिणी बैठक घेण्याची मागणी केली होती; पण ती न घेतल्याने अखेर महामंडळाचे कार्यवाह सुशांत शेलार यांच्या सूचनेनंतर कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.

यापूर्वी कोल्हापुरात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर बहुमताने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला होता. बुधवारी या ठरावावर हरकत घेण्यात येऊन तो ठराव बैठकीत कायम करण्यात आला. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्‍वास ठराव पुन्हा बहुमताने मंजूर झाल्यामुळे अभिनेते सुशांत शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीस एकूण 15 संचालकांपैकी 10 संचालक उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांतील खर्चावर आक्षेप घेत त्याचे पुनर्लेखापरीक्षण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भोसले यांनी कार्यकारिणीला विश्‍वासात न घेता सदरचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला. माजी अध्यक्षांनी कार्यकारिणी बैठक घेण्यावर आक्षेप घेतला होता. तो संचालकांनी बहुमताने फेटाळून लावला. संचालक बैठक नोटीस काढण्याचा व बैठक घेण्याचा अधिकार घटनेप्रमाणे प्रमुख कार्यवाह यांना असल्याने हा आरोप फेटाळण्यात आला.

चौदा संचालकांना पूर्वीप्रमाणे सभासदत्व बहाल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. खजिनदार संजय ठुबे अनुपस्थित असल्याने आर्थिक विषयावरील प्रश्‍न पुढील बैठक घेण्याचे ठरले व खर्चाबाबत काही आक्षेप असून त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचना मांडली गेली. महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्याबाबत यावर चर्चा करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांच्या रिक्‍त झालेल्या पदावर रणजित जाधव यांची नियुक्‍ती बहुमताने करण्यात आली. या बैठकीला सतीश बिडकर, शरद चव्हाण, रवींद्र गावडे, पितांबर काळे, सतीश रणदिवे, निकिता मोघे आदी उपस्थित होते.

सभा बेकायदेशीर : भोसले

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे काही संचालक हे मतलबी आहेत. त्यांनी आपल्या विभागात काय काम केले हे दाखवून द्यावे. कोरोना काळात सभासदांना मदत केली. यासाठी कायदेशीर व्यवहार केले. त्यामुळे बिनबुडाचे आरोप केले जात आहे. यांना भीक घालत नाही. कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार. दमदाटी आणि दंडुकेशाही चालणार नाही. आता निवडणूक लावा, मीच अध्यक्ष होणार, असे मेघराज भोसले यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news