

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजी संस्थान मठ धर्मपीठाचे नूतन मठाधिपती स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या उपस्थितीत महापट्टाभिषेक सोहळ्यानंतर शनिवारी भगवान आदिनाथ बृहन मूर्तीचा पहिला महामस्तकाभिषेक जैन मठ, शुक्रवार पेठ येथे उत्साहात झाला. जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर श्री 1008 भगवान आदिनाथांच्या 28 फूट उंच संगमरवरी पांढर्याशुभ— मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा धार्मिक वातावरणात झाला.
दरम्यान, रविवारी नूतन महास्वामीजींचा जाहीर पट्टाभिषेक अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता, राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे हा सोहळा होईल. यावेळी शाहू महाराज, श्रीक्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी पद्मभूषण डॉ. वीरेंद्र हेगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी मंगल कलश-नितीन मूग, इक्षू रस अभिषेक-राजेंद्र रोटे, दुग्धाभिषेक-प्रफुल्ल शिराळे, सर्वोषधी-कपिल दिलीप चव्हाण, कल्क चूर्ण-निर्मला मूग, कशाय चूर्ण-सतीश गाट, हळदाभिषेक-दीपक अथणे, कुंकूमाभिषेक-किरण तपकिरे, अष्टगंध अभिषेक-योगेश पंढरपुरे, पुष्पवृष्टी-राहुल मूग, मंगल आरती-अजिंक्य मगदूम, शांती कलश-निरंजन निल्ले, संगीत आरती-जैन सेवा संघ कोल्हापूर, चतुश कोन कलश-राहुल वणकुद्रे, रेखा वणकुद्रे व अनिल मुधाळे यांनी मान घेतले. कलशांतील द्रव्यांसह श्रावकांनी 1008 मंगल कलशांनी भगवंतांच्या मूर्तीवर मंगल कलश ढाळले. तत्पूर्वी, दुपारी समाधिस्थ श्री लक्ष्मीसेन महास्वामीजींची पूर्वांपार गुरुपूजा आणि समाधिस्थ डॉ. लक्ष्मीसेन महास्वामीजींप्रति विनयांजली महासभा झाली.