

कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळांमधील अस्वच्छतेचे आगर बनलेली स्वच्छतागृहे आता कार्पोरेट कंपन्या आणि तारांकित हॉटेलमधील लाजवतील अशी बनू लागली आहेत. कोल्हापूर स्टाईल इंटिग््रेाटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स संकल्पनेवर आधारित पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शंभर शाळांमधील स्वच्छतागृह बनविण्यात येणार असून आतापर्यंत 54 शाळांमधील स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिंनींना शाळांमध्ये स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यासाठी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांचेही सहकार्य लाभले, असे सांगून कार्तिकेयन म्हणाले, 200 पेक्षा अधिक विद्यार्थी असणाऱ्या शाळा, 100 ते 200 आणि 100 पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळा असे तीन प्रकार करण्यात आले. यासाठी 6 कोटी 50 लाख इतका खर्च आला असून पंधराव्या वित्त आयोगातून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. स्वच्छतागृहासाठी सर्व साहित्य नामवंत कंपन्यांचे वापरण्यात आले आहे.
प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये जलजीवन मिशन योजनेतून पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरसा, हँडवॉश, एअर फेशनर, फ्लॉवर पॉट, वॉश बेसीन स्वच्छतागृहात असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होऊन शाळांचा दर्जाही उंचाविण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये अशाप्रकारची स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.