

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत चुरशीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी तब्बल 1 हजार 176 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. उमेदवारी माघारीसाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. माघारीनंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241, तर पंचायत समित्यांच्या 136 जागांसाठी 455 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी छाननीनंतर 659 अर्ज, तर पंचायत समित्यांच्या 136 जागांसाठी 1,213 अर्ज वैध ठरले होते. शुक्रवार (दि. 23), शनिवार (दि. 24) काहींनी अर्ज माघारी घेतले. मंगळवारी (दि. 27) माघारीसाठी अखेरचा दिवस होता. यामुळे रविवार (दि. 25) व सोमवारी (दि. 26) असलेल्या सुट्टीच्या दिवशी उमेदवारांसह नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करत अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना यश आले. यामुळे काही मतदारसंघात थेट दुरंगी लढत होत आहे. काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे.
आज सकाळपासून माघारीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हा परिषदेसाठी एकूण 418 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे जि.प.साठी 241 जण निवडणूक रिंगणात राहिले. पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 758 जणांनी माघार घेतली. यामुळे पंचायत समितीसाठी 455 उमेदवार रिंगणात राहिले.
निवडणूक लढवणारे उमेदवार अंतिम झाल्याने मतदानाच्या प्रक्रियेला गती आली. उद्यापासून मतपत्रिका छपाई सुरू होणार आहे. यानंतर मतपत्रिकेसह ईव्हीएम सज्ज करण्याचे काम सुरू होणार आहे. दि. 4 फेबुवारी रोजी मतदान साहित्यांसह मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होणार आहे. तत्पूर्वी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण होणार आहे.