

मुंबई : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याचा निर्णय महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याचा निर्णय झाला. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेकडे देण्यात येणार आहे. तर, पूर्वी ठरल्यानुसार रायगडचे जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे.
महायुतीचा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून, तिन्ही पक्षांनी बुधवारी (दि. 11) समाधानकारक तोडगा काढला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
रायगड या सर्वाधिक अडचणीच्या ठिकाणीही तोडगा निघाला. जिल्हा परिषदेत पहिले सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष असेल. त्यासंबंधीची चर्चा निवडणुकीपूर्वीच झाली होती, असे समजते. याशिवाय अडीच वर्षे शिवसेना, तर सव्वा वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष, अशी विभागणी असेल. कोल्हापूर व पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. रत्नागिरीत मात्र शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे. माणगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती मिळणार. यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्यांना तसे कळवण्यात आले आहे.
अध्यक्षपद कोणाकडे?
कोल्हापूर : राष्ट्रवादी (अ.प.)
पुणे : राष्ट्रवादी (अ.प.)
रत्नागिरी : शिवसेना
रायगड : सध्या भाजप