

कोल्हापूर : जिल्हा परिषद (गट) आणि पंचायत समिती (गण) निवडणुकीसाठी मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोमवारी सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सभापतिपदाच्या आरक्षणासाठीही सोडत कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात निर्माण झालेली उत्सुकता आणि प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितींसाठी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे. पंचायत समिती सभापतिपदासाठीही साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे ठरविणार्या या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरक्षण सोडतीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघाच्या रचनेवरून चर्चांना उधाण आले होते. आता आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या सोडतीस लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. आहे.
सभापतिपदासाठी सोडत जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, कागल, गगनबावडा आणि शिरोळ या 12 पंचायत समिती सभापतिपदासाठी देखील सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.