कोल्हापूर : कुणी ‘अहं, सुट्टी नाहीच. आता टप्प्यात कार्यक्रम,’ असे म्हणत विरोधकांना आव्हान दिलं, तर कुणी ‘असं एक बी गाव नाही, तिथं आमचं नाव नाही...’ असं म्हणत आपली ताकद दाखवून दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना, सोशल मीडियावर रील्स आणि ‘स्टेटस वॉर’ही जोरदार रंगले होते. महानगरपालिकेच्या वेळी गाजलेल्या सोशल मीडिया पोस्ट आज पुन्हा व्हायरल झाल्या होत्या.
‘आज उरलेलं साम—ाज्य इस्कटणार!’, ‘अहं, सुट्टी नाहीच. आता टप्प्यात कार्यक्रम.’ ही पोस्ट आज निकाल जाहीर होताच भाजप समर्थकांनी पुन्हा फिरवली आहे. तर, ‘बंटी साहेब एकटा लढला. ढाण्या वाघ...’ अशा आशयाचे स्टेटस काँग्रेस समर्थकांकडून ठेवले जात होते. भाजप महिला कार्यकर्त्यांनी उचगावच्या निकालानंतर ‘आता कसं वाटतंय... गार गार वाटतंय’ म्हणत तयार केलेला व्हिडीओ स्टेटसला ठेवत विरोधकांना चांगलेच डिवचले.
भागातील कोणत्याही सुख-दुःखाप्रसंगी हजर राहणारे म्हणून ख्याती असलेल्या बाबासाहेब पाटील यांचे बंधू पोर्ले गटातून निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘माती (रक्षा विसर्जन) आणि दिवस (तेरावे) करून निवडून आणलं वाघाने,’ असे स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवले. निवडणूक केंद्राबाहेर विजयी उमेदवारांना कार्यकर्त्यांनी थेट खांद्यावर उचलून धरत काढलेल्या मिरवणुका आणि गुलालाने रंगलेल्या कार्यकर्त्यांच्या फोटोंनी स्टेटस रंगले होते. विजयाचा गुलाल उधळत असतानाच अनेक उमेदवारांनी विजयाचा ‘शड्डू’ ठोकला, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीत विरोधकांना चक्क ‘केळी’ दाखवून डिवचल्याचे पाहायला मिळाले. ‘निवडणुकीपूर्वीच्या वल्गना आता कुठे गेल्या?’
‘आज अजितदादा असायला हवे होते’
पुणे आणि कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी ‘आज आजदादा असायला हवे होते’ ही भावना सोशल मीडियावर दाटून आली आहे. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कार्यकर्त्यांनी हा विजय त्यांना समर्पित केला आहे.
रील्समध्ये हवा; मात्र ईव्हीएमवर धक्का
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘रील्स’ची हवा पेटीतून गायब झाल्याचे पाहायला मिळाले. 5 लाख फॉलोअर्स असलेल्या रीलस्टार निर्मला नवलेंना कारेगाव गटात मतदारांनी चक्क घरचा रस्ता दाखवला. निकालानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलीये, ‘पाच लाख फॉलोअर्स गेले कुठे?’ रील्सवर हार्टस् देणारे बोट मतदानाच्या बटणापर्यंत पोहोचलेच नाही. या निकालाची जोरदार चर्चा सोशल मीडियात होती.