कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि 12 पंचायत समितीच्या एकूण 136 गणांसाठी (मतदारसंघ) 2 हजार 691 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील 23 लाख 40 हजार 199 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानुसार या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 रोजी मतदार यादी ग्राह्य धरून मतदार संघ निहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी 11 लाख 87 हजार 203 पुरुष, 11 लाख 52 हजार 909 महिला मतदार तर 87 इतर मतदार आहेत. इतर मतदारांत सर्वाधिक करवीर तालुक्यात 35 मतदार आहेत. चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी या चार तालुक्यात एकही इतर मतदार नाही.
या निवडणुकीत सर्वाधिक मतदार करवीर तालुक्यात 4 लाख 8 हजार 174 इतके आहेत तर सर्वात कमी मतदार गगनबावडा तालुक्यात 28 हजार 922 इतके आहेत. करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक 12 आणि पंचायत समितीचे सर्वाधिक 24 मतदार संघ आहेत. त्यामुळे करवीरमध्येच सर्वाधिक 417 मतदान केंद्रे आहेत. गगनबावडा आणि आजरा तालुक्यात सर्वात कमी मतदार संघ आहेत. येथे जिल्हा परिषदेचे प्रत्येकी दोन आणि पंचायत समितीचे प्रत्येकी चार मतदार संघ आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वात कमी 46 मतदान केंद्रे आहेत.