

कोल्हापूर : आंबोली येथे दरीत पडलेल्या जिल्हा परिषदेतील कर्मचारी राजेंद्र सणगर (वय 45, रा. चिले कॉलनी) यांचा मृतदेह शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मृतदेह चिले कॉलनी येथील निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राजेंद्र सहकार्यांसमवेत शुक्रवारी सकाळी कोल्हापुरातून निघाले होते. दुपारी आजरा येथे भोजन केले. आंबोलीमध्ये कावळेसाद पॉईंट जवळ असणार्या रेलिंगला राजेंद्र टेकून उभा असताना अचानक त्यांचा हात सटकला आणि तो रेलिंगच्या पुढे पडला. तेथून उठण्याचा प्रयत्न करताना पाय निसटला आणि ते थेट दरीत कोसळले. राजू सुखरूप बाहेर येईल, या प्रतीक्षेत रात्रभर त्यांचे सहकारी होते; परंतु सकाळी त्यांचा मृतदेहच घेऊनच त्यांना कोल्हापूरला परतावे लागले. रात्री त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. राजेंद्र मनमिळावू होते. त्यांचे वडील जिल्हा परिषदेत शिक्षक होते. सेवेत असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्या जागी राजेंद्र अनुकंपाखाली सन 2006- 07 च्या दरम्यान रुजू झाला.
जि. प. कर्मचारी सोसायटीचे माजी अध्यक्ष रणजित पाटील यांचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिनीच त्यांना आपला मित्र राजेंद्र सणगर याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे त्यांना हुदंके आवरता येत नव्हते.