

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्याने मतदारांनी सत्तेच्या चाव्या महायुतीकडे दिल्याचे दिसून येत आहे. यामुळे विधानसभा, महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही लाडक्या बहिणींचा कौल महायुतीलाच असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत 23 लाख 40 हजार 191 मतदार होते. यापैकी 17 लाख 42 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 8 लाख 95 हजार पुरुष, तर 8 लाख 46 हजार महिला मतदारांचा समावेश आहे. आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज या तालुक्यांत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे जास्त मतदान झाले. या तीन तालुक्यांसह इतर 9 तालुक्यांमधील लाडक्या बहिणींचा कौल कोणाला असणार, हे औत्सुक्याचे होते.
सोमवारी जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये 68 पैकी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्य या महायुतीचे 46 उमेदवार विजयी झाले आहेत. याचबरोबर महायुतीच्या संख्याबळावर जिल्हा परिषदेवर सत्तेचा दावा केला आहे. यावरून लाडक्या बहिणींचा पुन्हा कौल महायुतीला असल्याचे दिसून आले आहे.
आजरा, चंदगड, गडहिंग्लजमध्ये महायुतीकडेच कौल
जिल्हा परिषदेच्या 12 तालुक्यांपैकी आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तीन तालुक्यांत महिला मतदारांची मते पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त झाली होती. या ठिकाणी 11 जागांपैकी 9 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी 7, भाजप 1 उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरीत विजयी दोन उमेदवार स्थानिक आघाडीचे असले, तरी ते राष्ट्रवादीचेच असल्याचे समजते. यामुळे तीन तालुक्यांत 100 टक्के महायुतीचेच उमेदवार विजयी झाले असून, या ठिकाणी लाडक्या बहिणींचा कौल महायुतीला असल्याचे स्पष्ट होत आहे.