

कोल्हापूर : महानगरपालिकेतील महापौर थोडक्यात हुकले. महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही इच्छुकांची काँग्रेसकडे गर्दी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला निश्चित बहुमत मिळेल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी सात सामंजस्य करार केले असल्याचे सांगितले. मी ते गुगलवर शोधतोय; परंतु सापडत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आमची तयारी अगोदरपासून सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शक्य आहे त्या तालुक्यात येतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटना , शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाशी तर शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गटाशी आघाडी झाली. येथे वंचित बहुजन आघाडीही सोबत येत आहे, असेही पाटील म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी सात सामंजस्य करार केल्याचे सांगितले होते. तोच सामंजस्य करार मी गुगलवर शोधतोय असा टोला आ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. दावोस दौर्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूरसाठी काही आणतील, याबाबत शंका असल्याचेही पाटील म्हणाले.
...तर महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता
ताकद होती तर भाजप, शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवार राष्ट्रवादी स्वतंत्र का लढले नाहीत, असा सवाल करून आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता. आमचे 5 उमेदवार 500 मताधिक्याने पराभूत झाले. काही ठिकाणी अपक्षांचा फटका बसला आहे. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीला मिळालेला विजय हा तांत्रिक विजय आहे. त्यांनी तो साजरा करावा; परंतु लोकांचं मत आमच्या बाजूने होते हे निकालाने दाखवून दिले आहे.
34 उमेदवार निवडून देणार्या जनतेचा अपमान
काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आणले म्हणजे आमदार सतेज पाटील यांनी पराक्रम केला नाही, या मंत्री मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, 34 जागा सतेज पाटीलने मिळवल्या नाहीत, जनतेने निवडून दिल्या आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांचे वक्तव्य उमेदवार निवडून देणार्या जनतेचा अपमान करणारे आहे. गरज नसलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम आहे.
काँग्रेसच्या नगसेवकांचे लवकरच प्रशिक्षण
हिंमत असेल तर महायुतीने महापौरपदी ज्यांची निवड होईल, त्यांना अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू द्यावा. महापौरपदाचे तुकडे करू, असे आम्ही कधी म्हटलो नाही. काँग्रेसच्या नगसेवकांचे लवकरच प्रशिक्षण घेणार असून, चांगल्या कामाला नक्की पाठिंबा राहील, असेही पाटील यांनी सांगितले.
आ. पाटील म्हणाले...
नगरसेवक फोडले जातील या भीतीने मुंबईतील नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले असावे
डबल इंजिनच्या सरकारने कामातून गती दाखवून द्यावी
महाविकास आघाडीतील नाराजांवर आपण टीका करणार नाही
महापालिकेत काही अपक्षांचा फटका