

कोल्हापूर : दिवसरात्र कष्ट करून मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पाहणार्या पालकांसह विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या काळात 90 पेक्षा जास्त परीक्षांचे पेपर फुटले असून, ते पेपर माफियांसाठी काम करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांनी केला. तसेच मंत्री धमेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेईपर्यंत देशाच्या कानाकोपर्यात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
नीट पेपर फुटीसह सीबीएसई परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ सोमवारी युवक काँग्रेसच्या वतीने शाहू समाधी स्थळ येथे आयोजित कँडल मार्च प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस अजय छिकारा, सचिव नवज्योत सिंग संधू , सचिव शांभवी शुक्ला प्रमुख उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात तीव— शब्दांत घोषणाबाजी करण्यात आली.
उदयभानू चिब म्हणाले, शिक्षण मंत्री प्रधान यांच्या काळात 90 पेक्षा जास्त परीक्षांचे पेपर फुटले आहेत. धमेंद्र प्रधान प्रधान पेपर माफियांसाठी काम करत असून त्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत. पेपर फुटीमुळे वर्षानुवर्षे अभ्यास करणार्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. याला सर्वस्वी मंत्री धमेंद्र प्रधान आणि भाजप सरकार जबाबदार आहेत.
आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारने विद्यार्थी, पालकांच्या स्वप्नांसोबत खेळ केला आहे. दरवर्षी नीट परीक्षेमध्ये 23 लाख विद्यार्थी सहभागी होतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा जर सरकारला सुरळीत पार पाडता येत नसेल, तर देशातील 130 कोटी जनतेचा सांभाळ कसा करणार, असा सवाल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, नगरसेवक सुभाष बुचडे, राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, राहुल माने, संजय मोहिते, अर्जुन माने, विनायक कारंडे, प्रतापसिंह जाधव, प्रशांत खेडकर, विशाल चव्हाण, अमर समर्थ, सचिन शेंडे, सचिन चौगले, उमेश पोवार, रोहित कवाळे, ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे यांच्यासह युवक, युवती उपस्थित होत्या. शाहू समाधीस्थळ येथून कँडल मार्च टाऊन हॉल, सीपीआर मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे विसर्जित झाला.