

कागल : मावस बहिणीचा पाठलाग करीत असल्याच्या संशयावरून दोघांनी दुचाकी अडवून केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नीलेश नामदेव पाटील (वय २८, रा. साके, ता. कागल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास साके-बाचणी रस्त्यावर घडली. याप्रकरणी विघ्नेश अरविंद पवार (वय २२, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) आणि प्रथमेश ऊर्फ गुंड्या आनंदा पाटील (वय २४, रा. साके) यांच्या विरोधात कागल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश पाटील हा २ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास साके-बाचणी रस्त्यावरून दुचाकीने जात होते. मळ्यातील नवीन घराजवळील पाण्याच्या टाकीजवळ आले असता संशयितांनी त्यांची दुचाकी अडवली. ‘आमच्या मावस बहिणीच्या मागे का लागला आहेस’ असा जाब विचारत दोघांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर दोघे दुचाकीवरून पसार झाले. गंभीर जखमी नीलेश याला उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नीलेश यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. याबाबत प्रवीण नागेश पाटील (वय २३, रा. साके) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक रमेश तावरे पुढील तपास करीत आहेत.