

नागाव: फॅब्रिकेशनचे काम करताना विजेच्या धक्क्याने बेळगावच्या तरुणाचा मृत्यू झाला. सागर शिवानंद बावकर (वय ३८, सद्या रा. कासेगाव, जि. सांगली, मूळ रा. रामतीर्थ गल्ली, हलशी ता. खानापूर, जि. बेळगाव ) असे त्याचे नाव आहे. नागाव येथील बाळूमामा कॉलनी, माळवाडी येथे शुक्रवारी (दि.१६ जानेवारी) सकाळी ही दुर्घटना घडली.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागाव येथील बाळूमामा कॉलनी येथे तानाजी पुजारी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे फॅब्रिकेशनचे काम बेळगाव येथील सागर बावकर हा तरुण करत होता. शुक्रवारी सकाळी लवकर तो कामाच्या ठिकाणी आला होता. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून टेरेसवर जाण्यासाठी जिना बसविण्याचे काम सुरू होते. टेरेसवर जाण्यासाठी लोखंडी शिडी लावत असताना इमारतीच्या वरून गेलेल्या सर्व्हिस वायरला शिडीचा स्पर्श झाला. त्यामुळे सागरला विजेचा धक्का बसला. यामध्ये सागरचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठविला. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.