

कोल्हापूर : गेली चाळीस वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केलेल्या वडिलांच्या निवृत्तीचा कार्यक्रम 31 मे रोजी करण्याची जोरदार तयारी सुरू होती. पप्पा, आता तुम्ही छान आराम करायचा, फिरायला जायचे असे म्हणत निवृत्तीच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना त्याला उत्साह आला होता. स्वत: बास्केटबॉल खेळाडू असल्याने फिटनेसबाबत कायम आग्रही असायचा. मात्र, वडिलांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाआधीच तरुण मुलाची आयुष्यातूनच एक्झिट झाली आणि पाचगावातील पाटील कुटुंबीयांना जबर धक्का बसला. उदय अशोक पाटील (वय 32) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, मित्राच्या हळदीचे जेवण जेवताना ठसका लागल्याचेनिमित्त झाले अन् त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा अंत झाला.
उदय हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होता. पत्नी, तीन वर्षांची मुलगी, आई, वडील, भाऊ आणि भावजय यांच्यासोबत तो पाचगावमधील पोवार कॉलनी येथे राहत होता. कष्टातून शिक्षण घेऊन बास्केटबॉलमध्ये उदयने अनेक स्पर्धा गाजवल्या. मदतीला धावून जाण्याचा त्याचा स्वभाव असल्याने मित्रपरिवारही खूप होता. गुरुवारी (दि. 7) सायंकाळी आपटेनगर येथील मित्राच्या लग्नाच्या हळदी कार्यक्रमात उदय सहभागी झाला होता. हळदीचे जेवण जेवताना उदयला ठसका लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लग्नातही उदयचे सावट
गुरुवारी सायंकाळी वादळी वारे वाहत होते. त्यामुळे पाऊस दाटून आला होता. म्हणून वडिलांनी लवकर ये, अशी सूचना केली होती. लवकर येतो, असे सांगून घराबाहेर पडलेला उदय मात्र घरी परतलाच नाही. शुक्रवारी उदयचे कुटुंबीयही मित्राच्या लग्नाला जाणार होते. मात्र, त्या मित्राच्या लग्नातही उदयच्या आठवणींचेच सावट होते.