

वीरकुमार पाटील
कोल्हापूर : एकेकाळी जिथे पैलवानांच्या विजयी आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून जायचा, लाल मातीचा सुगंध आणि घामाचा दर्प हाच इथला स्थायीभाव होता, त्या राजर्षी शाहू महाराजांच्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात आज भयाण शांतता पसरली आहे. आता तेथे रात्री दारुड्यांचा गोंगाट ऐकू येतोय. सर्वत्र झुडपे, गवत उगवलेले आहे. त्यामुळे या मैदानाची हृदय पिळवटून टाकणारी अवस्था पाहूनच सोमवारी कोल्हापुरातील मल्ल, वस्ताद आणि कुस्ती शौकिनांच्या संतापाचा उद्रेक झाला.
गुरुवार, दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीनंतर केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभे राहते आहे; पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खासबागचे स्वप्न दिवसेंदिवस कोसळत चालले आहे. सध्या तिथं काय आहे? पडक्या वाड्यात असते तशी भयाण शातंता. ज्या मैदानाला पैलवान आपले मंदिर आणि लाल मातीला दैवत मानतात तेथे आज जागोजागी पडलेले बांधकामाचे दगड आणि निरुपयोगी साहित्याचा खच पडला आहे. पावसाळ्यात उगवलेली झुडपे महापालिकेने काढली असली, तरी काही ठिकाणी अस्वच्छता आहे. देखणे लाकडी व्यासपीठ होते तेथे जेसीबीने काढलेले खड्डे, बाजूलाच राडारोडा, अर्धवट उभारलेले लोखंडी पोल आहेत. हे केवळ मैदानाचे नुकसान नाही, तर कुस्ती परंपरेच्या अभिमानावर झालेला आघात आहे.
या मैदानात सोमवारी झालेल्या आंदोलनावेळचे चित्र अत्यंत भावनिक होते. ‘ही फक्त माती नाही, आमचं मंदिर आहे, असे सांगताना ज्येष्ठ वस्तादांचा कंठ दाटून आला. ‘याच मातीत शाहू महाराजांनी कुस्तीचे बीज रोवले. आम्ही याच मातीत घडलो. आज आमच्या या मंदिराची आणि दैवताची अवस्था पाहून ऊर पिळवटून चाललाय. प्रशासनाला याचं काहीच सोयरसुतक नाही का? असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला.
आक्रोशाचा शेवट... की नव्या लढ्याची सुरुवात?
सोमवारचे आंदोलन हे वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा स्फोट होता. जर शाहू महाराजांच्या या पवित्र वास्तूची अशीच दुर्दशा होत राहिली, तर आम्ही येणार्या पिढीला कोणता वारसा देणार? आम्ही प्रेरणा कुणाकडून घ्यायची? असा सवाल एका तरुण मल्लाने विचारला.
या आंदोलनाने प्रशासनाला जागे केले असले, तरी केवळ आश्वासनांवर आता विश्वास ठेवण्यास कुस्तीगीर तयार नाहीत. जोपर्यंत खासबाग मैदानाला गतवैभव परत मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात मल्लांना सराव करता येईल एवढी सोय झाली आहे. परंतु इतर सोयींबाबत प्रशासनाच्या कृतीकडे केवळ कोल्हापूरचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे डोळे लागले आहेत. शाहूंच्या या वारशाची धूळधाण थांबली नाही तर एक दिवस सहनशक्तीचा कडेलोट झालेले पैलवान प्रशासनाला, उठसूठ शाहू महाराजांचे नाव घेणार्या राजकारण्यांना धोबी पछाड लावतील हे नक्की !
ऐतिहासिक वारशाची विटंबना
शाहू महाराजांनी दूरद़ृष्टीने 1912 साली बांधलेले हे खासबाग मैदान कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. मात्र, सध्या या वारशाची अक्षम्य हेळसांड होत आहे. मंगळवारी पै. संग्राम कांबळे, बाबा महाडिक यांनी रोटावेटरने आखाड्यातील माती नांगरून घेतली आहे. तरीही परिसरातील विद्रुपीकरणामुळे मैदानाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. ही पवित्र लाल मातीची अक्षरशः विटंबना होत आहे. पैलवानांसाठी स्फूर्तिस्थान असलेल्या या जागेची झालेली दुर्दशा ही केवळ प्रशासकीय अनास्था नसून, तो संपूर्ण कुस्ती परंपरेचा अपमान आहे.
मी शाहूंची ओळख की, फक्त इतिहासाचे एक विसरलेले पान?
दुर्लक्षामुळे खासबाग मैदानाचे एक एक सांधे निखळत आहेत. तटबंदीच्या बाजूचे दगडी जिने कमकुवत होत आहेत. 25 जुलै 2023 रोजी पावसामुळे मैदानाच्या तटबंदीची भिंत कोसळून एक निष्पाप जीव गेला. ती भिंत आजही प्रशासनाच्या मुर्दाडपणाची साक्ष देत तशीच पडकी आहे. आज खासबाग मैदान मूकपणे विचारत आहे, मी कोणाचा वारसा आहे? मी शाहूंची ओळख की, फक्त इतिहासाचे एक विसरलेले पान? हे सगळे न दिसायला प्रशासनाने डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधली आहे काय? की या मातीतून उमटणारी हाक ऐकू न यायला त्यांच्या कानात दडे बसले आहेत?