

कोल्हापूर : प्राचीन भारतात उगम पावलेल्या आध्यात्मिक व शारीरिकशास्त्र असणार्या योगाची परंपरा कोल्हापुरात अखंड जपण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर आधुनिक युगात हा योगा अनेकांच्या करिअरचे माध्यम म्हणून नावारूपाला आला आहे.
देशभरात योग प्रशिक्षण, अभ्यास करणार्या विविध संस्था-संघटना सक्रिय आहेत. विवेकानंद योग संस्था, योग विद्याधाम, पतंजली योगपीठ, कैवल्य धाम लोणावळा, योग विद्याधाम नाशिक, कालिदास विद्यापीठ रामटेक, संत निरंकारी मिशन या व अशा संस्था-संघटनांच्या माध्यमातून योग प्रसाराचे काम सुरू आहे. याला कोल्हापूरसुद्धा अपवाद नाही.
कोल्हापुरात एक लक्ष सूर्यनमस्कार संकल्पाची अनोखी परंपरा भक्ती-सेवा विद्यापीठ हायस्कूलने जपली आहे. 72 वर्षांपासून शाळेत हा उपक्रम अखंड सुरू आहे. एक लक्ष सूर्यनमस्काराचा उपक्रम दि. 1 ऑगस्ट 1953 पासून सुरू करण्यात आला. या संकल्पनेंतर्गत शाळेत प्रतिवर्षी दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या पूर्ण महिनाभरात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दररोज झेपतील तेवढे सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा आजही सुरू आहे.
माणसाला शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य देणारा योगा आज जीवनशैली आणि करिअरचा मार्ग बनला आहे. कोल्हापूरच्या योग अभ्यासाची परंपरा विकसित करण्याचे कार्य योग विद्या धाम, पतंजली योगपीठ व शिवाजी विद्यापीठसारख्या संस्था-संघटना करत आहेत. शिवाजी विद्यापीठात आजीवन अध्ययन विभागातर्फे योग प्रशिक्षण वर्गातून दरवर्षी 100 योगशिक्षक तयार होतात. 2023 पासून एम.ए. योगशास्त्र विषय सुरू करण्यात आला आहे. ताराराणी विद्यापीठासह ठिकठिकाणी पतंजलीसारख्या योग संस्था दैनंदिन योग वर्ग घेतात. आयुष मंत्रालयाच्या वतीने योगासंदर्भातील ऑनलाईन व ऑफलाईन कोर्स सुरू आहेत.