

कोल्हापूर : बदललेली जीवनशैली, हार्मोनल इमबॅलन्समुळे दर दहा स्त्रियांमागे एक स्त्री थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र, सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून थायरॉईडचे लवकर निदान करुन वैयक्तिक उपचार योजना तयार केल्या जात आहे.
यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागत आहे. जागतिक थायरॉईड दिन दरवर्षी 25 मे रोजी साजरा केला जातो. थायरॉईड ग्रंथीविषयी जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. थायरॉईड आजार व कृत्रिम बुद्धिमत्ता ही यावर्षीची थीम आहे. आता हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक दिसून येतो. यात अनेकवेळा भावनिक चढउतार येत असल्याने याचा हार्मोन्सच्या असंतुलनावर परिणाम होतो.
अमेरिकन थायरॉईड असोसिएशनच्या अहवालानुसार जगभरात 20 कोटींपेक्षा अधिक तर भारतात 4.2 कोटी लोक थायरॉईड आजाराने ग्रस्त आहेत. हायपोथायरॉईडिझम, थायरॉईडनोडूल्स, गॉईटर, थायरॉईड कॅन्सर हे मुख्य प्रकार आहेत. सध्या अनेक महाविद्यालयीन तरुणींमध्ये थायरॉईड, पीसीओडीचे प्रमाण अधिक दिसून येते. प्रौढावस्थेतील स्त्रियांमध्ये प्रसूतीपश्चात व रजोनिवृत्तीच्या काळात थायरॉईड आजार दिसून येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढ रुग्णांना दिलासा मिळत आहे.
पूर्वी थायरॉईड आजाराचे मुख्य कारण आयोडीनची कमतरता हे होते; परंतु आज बदललेली जीवनशैली, सततचा ताणतणाव, अपुरी झोप, संतुलित आहाराची कमतरता, व्यायामाचा अभाव ही थायरॉईड आजाराची कारणे ठरत आहेत.