World Plastic Surgery Day | प्लास्टिक सर्जरी (सुघटन शल्यचिकित्सा)

World Plastic Surgery Day
World Plastic Surgery Day | प्लास्टिक सर्जरी (सुघटन शल्यचिकित्सा)File Photo
Published on
Updated on

डॉ. महेश प्रभू, कोल्हापूर

प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त चेहरा बदलणे किंवा भाजल्यावर त्वचा चिकटवणे एवढे मर्यादित नसून ही शस्त्रक्रियेची प्रगत शाखा आहे. प्लास्टिकॉस या ग्रीक शब्दावरून आलेला हा शब्द आकार बदलणे दर्शवतो. या शस्त्रक्रियेचा इतिहास मोठा रंजक आहे. भारतीय शल्यतज्ञ सुश्रुत यांनी नाक पुन्हा बनवण्यासाठी शस्त्रक्रियेचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये केले आहे. तेव्हापासून पुनर्निर्माण शस्त्रक्रिया (Reconstructive Surgery) आणि सौंदर्यवर्धन शस्त्रक्रिया (Cosmetic Surgery) विकसित झाल्या आहेत. प्लास्टिक सर्जरी म्हणजे शास्त्र, तंत्रज्ञान आणि कला यांचा संगम असतो. या शस्त्रक्रियेच्या साह्याने प्लास्टिक सर्जन त्वचा, हाडे, स्नायू, नसा यांचा सखोल अभ्यास करून शरीराची कमतरता भरून काढतात.

समाजात या शस्त्रक्रियेबाबतचे धोके व खर्च याबद्दल अनेक गैरसमज आढळतात पण त्यामध्ये तथ्य नाही. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे प्लास्टिक सर्जरी अत्यंत सुरक्षित बनली आहे. तसेच भारतात बहुतेक शस्त्रक्रियांचा खर्च सामान्य माणसाला परवडेल इतकाच आहे. प्लास्टिक सर्जरीच्या साह्याने शारीरिक व्यंग निश्चित दुरुस्त करून घ्यावे; कारण माणसाच्या दिसण्यावरच समाजात त्या व्यक्तीचे स्थान ठरत असते. कारण दिसण्यामुळे व्यक्तिमत्त्वावर, नोकरी, व्यवसाय, वैयक्तिक आयुष्य अवलंबून असते. जन्मजात शारीरिक दोष, अपघात यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते अशावेळी प्लास्टिक सर्जरी ही वरदान ठरते.

या सर्जरीमुळे आत्मविश्वास परत येतो. सर्जरीने जन्मजात व्यंग, फाटलेले ओठ-टाळू, अपूर्ण अवयव, डाग, हिमॅजिओमा, हायपोस्पेडीयास इत्यादी सांधता येतात. ओठ व टाळूच्या शस्त्रक्रियेसाठी जास्तीत जास्त 45 मिनिटांपासून 120 मिनिटे वेळ लागू शकतो. काही वेळा विशिष्ट प्रकारच्या रोगामुळे आलेली व्यंगे उदाहरणार्थ लकवा, कोड, भाजल्याने आकसणे, मुरमांचे व्रण हेही प्लास्टिक सर्जरीच्या साह्याने दुरुस्ती करता येते. अपघातानंतरचे व्यंग जसे की चेहर्‍यावरील जखमा, व्रण, सांधे आखडणे यांच्यावरही या शस्त्रक्रियेने चांगले उपचार करता येतात. याचबरोबर अपघातानंतरच्या शस्त्रक्रियेमुळे आलेली विद्रुपताही प्लास्टिक सर्जरीने सहज घालवता येते. तसेच कर्करोगानंतरची अवयव पुनर्निर्मितीही या शस्त्रक्रियेमुळे शक्य आहे. टक्कल पडणे, ओघळलेली त्वचा, लठ्ठपणा यावरही या शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात. याचबरोबर नसा, रक्तवाहिन्या, पेशी जोडणी, संतती नियमनानंतर पुनः अपत्यप्राप्तीसाठी नसजोडणी यासाठी मायक्रोसर्जरीची गरज असते. तीही प्लास्टिक सर्जरी द्वारे करता येते.

सौंदर्यवर्धन शस्त्रक्रिया (Cosmetic Surgery) यामध्येही प्लास्टिक सर्जरीचे योगदान महत्वपूर्ण आहे. नाक, कान, ओठ, चेहरा, स्तन, पोट, चरबी यावर विविध प्रकारचे उपचार याद्वारे करता येतात. पुनर्निर्माण शस्त्रक्रिया (Reconstructive Surgery), त्वचारोपण (Skin Grafting), अपघात, भाजल्याने झालेल्या जखमांवर त्वचा लावणे इत्यादी उपचारही याद्वारे करता येतात. प्लास्टिक सर्जरी द्वारे करता येणारा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा उपचार म्हणजे हँड सर्जरी. याद्वारे हातातील व्यंग, इजा, तुटलेला अंगठा जोडणे इत्यादी उपचार करता येतात. चेहर्‍याची सर्जरी यामध्ये चेहर्‍याचे हाड, त्वचा, नसा यांची पुनर्रचना करता येते. सौंदर्यवर्धन शस्त्रक्रिया (Cosmetic Surgery) यामध्ये रायनोप्लास्टी (Rhinoplasty) चा समावेश होतो. या शस्त्रक्रियेच्या साह्याने नाक उंच करणे, सरळ करणे, नाकाची जाडी कमी करणे इत्यादी गोष्टी करता येतात. ऑरोप्लास्टी (auroplasty) यात कानाचा आकार दुरुस्त करता येतो.

पापण्या दुरुस्त करणे (Blepheroplasty) - सैल त्वचा कमी करणे याही गोष्टी करता येतात. भुवया उंचावणे (Brow Lift), ओठ पातळ करणे, हनुवटी दुरुस्ती (Receding chin), सिलिकॉन इंप्लांट घालून हनुवटी ठराविक आकारात आणणे, चेहर्‍यावरील चामखीळ, व्रण, डाग काढणे या गोष्टी करता येतात. लेझरने किंवा शस्त्रक्रियेद्वारे पांढर्‍या डागांचे रोपण (Over Grafting), चांगल्या त्वचेचा थर लावणे, मुरमांच व्रण (Dermabrasion/Micro dermabrasion), त्वचा गुळगुळीत करणे शक्य आहे.

स्तन शस्त्रक्रिया, स्तन उचलणे (Mastopexy), ओघळलेले स्तन घट्ट करणे, स्तन वाढवणे (Breast Enlargement), सिलिकॉन इंप्लांट बसवणे, स्तन कमी करणे (Breast Reduction), अतिबेडौल स्तन लहान करणे यासाठीही प्लास्टिक सर्जरी वरदान ठरते. त्याबरोबर काही पुरुषांमध्ये स्तन कमी करणे (Gynaecomastia), अनावश्यक वाढलेला स्तन कमी करणे या गोष्टीही करता येतात. प्लास्टिक सर्जरीच्या साह्याने इतरही काही शस्त्रक्रिया करता येतात. यामध्ये पोट कमी करणे (abdominoplasty), सुटलेले पोट घट्ट करणे, चरबी कमी करणे (Liposuction), हात, पाय, पोट, कंबर, हनुवटीवरील चरबी काढणे यांचा समावेश होतो. त्याचबरोबर चरबीचे भरण (ऋरीं खपक्षशलींळेप), गाल, ओठ यांना उठाव आणणे या गोष्टीही करता येतात. त्याचबरोबर केसांचे रोपण (Hair Transplant), मायक्रोग्राफ्टिंगने नैसर्गिक केस लावणे हेही आता शक्य झाले आहे. लेझर उपचार (Laser Treatment), चेहर्‍यावरील डाग, चामखीळ, व्रण, सुरकुत्या कमी करण्यासाठीही प्लास्टिक सर्जरीचा वापर केला जातो. यामध्ये त्वचेचा घट्टपणा वाढतो तसेच चेहरा तरुण दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news