

कोल्हापूर : कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील तिचा खरा आनंद म्हणजे आई होणे हा असतो. परंतु हळूहळू स्त्रियांमध्ये हार्मोन्स बदलामुळे मानसिक बदल व्हायला चालू होतात आणि हा क्षणिक आनंद पूर्णपणे मावळतो. असुरक्षितता, अपुरी झोप, सामाजिक दबाव, कुटुंबातील जबाबदार्या, अन्य कारणांमुळे त्यांच्या प्रसूतीनंतर नैराश्याला सुरुवात होते. कधी कधी अशावेळी स्त्रियांच्या मनात अकारण चिडचिड, स्वत:च्या बाळाबद्दल कोणतीच भावना न होणे, आत्महत्या यांसारख्या नकारात्मक विचारांनी त्यांना ग्रासले जाते.
पहिल्या महिन्यापासून ते तिला बाळ होईपर्यंत गरोदर स्त्रीची काळजी घेतली जाते. परंतु शरीरात जसे हळूहळू बदल होत असतात, तसेच त्या कालावधीत गर्भवती महिलेच्या मानसिक आरोग्यातही वेगवेगळे बदल होतात. अशावेळी डॉक्टरांकडून फक्त शारीरिक चाचण्यांद्वारे महिलेची तपासणी केली जाते. परंतु त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
कधी कधी गर्भवती किंवा नुकत्याच गर्भधारणा झालेल्या स्त्रियांमध्ये पोस्टपार्टम सायकोसिस किंवा बेबी ब्लूज नावाच्या समस्या आढळून यायला सुरुवात येते. या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये महिलांमध्ये खचलेला मूड, वारंवार रडणे, बाळाची अतिकाळजी करणे किंवा अपुरी झोप यामुळे चिडचिड होत राहते.
भूक मंदावणे, एकटेपणाची भावना यांसारखी लक्षणे दिसून येतात. पोर्स्टपार्टम ब्लूज, पोस्टपार्टम डिप्रेशन हे दोन्हीही महिलांमध्ये प्रसूतीनंतर दिसून येतात. या दोन्हीचीही तीव—ता वेगवेगळी असते. ब्लूजमध्ये रडू येणे, थोडी चिडचिड होते. याची लक्षणे सौम्य प्रमाणात असते. वेळेत उपचार घेतल्यास सात ते आठ दिवसांत ही समस्या कमी होऊ शकते. यामुळे महिलांनी वेळोवेळी आपल्या मानसिक आरोग्याबाबत जागरुक असले पाहिजे.
प्रसूतीनंतर किंवा गरोदरपणात गर्भवती महिलेत अशी लक्षणे दिसल्यास ती लपवून ठेवण्यापेक्षा ती आपल्या जवळच्या माणसांसोबत यांविषयी चर्चा केल्यास आणि वेळेत मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केल्यास बाळाची वाढ आणि आईचे मानसिक आरोग्य हे दोन्हीही सुरक्षित राहू शकते.