

कोल्हापूर : जागतिक बँकेच्या प्रकल्पातून येणारे पैसे कशासाठी खर्च होणार आहेत? कोल्हापूर, सांगलीत त्यातून काय होणार आहे? हे विस्ताराने दाखवले पाहिजे, असे सांगत हा प्रकल्प पूर रोखण्यासाठी उपयुक्त नसल्याचे वाटते, असे प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.
दरम्यान, ताकारी-टेंभू योजनेतील मोटारींचे बिल किती येते ते एकदा विचारा, असेही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना बुधवारी सांगितले. अलमट्टी उंचीवाढीविरोधात मंत्रालयात बैठक झाली. मात्र, त्याला आम्हाला बोलावले नाही, असे सांगत आ. पाटील म्हणाले, अलमट्टीच्या उंचीबाबत महाविकास आघाडी मोठे आंदोलन करू शकली असती, तितकी ताकद आहे. मात्र, हा सर्वांचाच विषय आहे. यामुळे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन केले. मात्र, सरकारने त्याला पक्षीय रंग दिल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्नाटक सरकार उंची वाढवण्याबाबत ठाम भूमिका घेत आहे. महाराष्ट्राचीही उंचीविरोधात ठाम भूमिका आहे, हे दिसले पाहिजे असे सांगत ते म्हणाले, हा राजकारणाचा विषय नाही, हा सर्वांचाच विषय आहे हे आता सरकारच्या लक्षात आले आहे, त्यामुळे कोल्हापुरात चार-पाच दिवसांत बैठक होणार आहे. त्यात आमचे मुद्दे प्रभावीपणे मांडू, असेही त्यांनी सांगत अलमट्टीच्या पाणीसाठ्याबाबत समन्वयाने नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
शेतकर्यांचे पावसाने मोठे नुकसान झाले असताना कृषिमंत्री, मुख्यमंत्री अथवा कोणताही मंत्री शेतकर्यांच्या बांधावर गेलेले आपण तरी पाहिलेले नाही, त्यातून सरकारची शेतकर्यांविषयी भूमिका स्पष्ट होते. शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, यांची चर्चा काय तर महापालिकेत कोणाला किती जागा द्यायची, यावर सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबई हे देशाचे नाक आहे; पण तिथे मेट्रोही चांगली करू शकत नाहीत, हे महायुतीने जगाला दाखवून दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शिवराज्याभिषेक दिनाच्या तारखेच्या वादात न पडता, त्यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असेही भिडे यांच्या वक्तव्यावर बोलतानाच तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यामागे त्यांचा वेगळा अजेंडा असू शकतो, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, असेही सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत बोलताना पाटील म्हणाले.