

कोल्हापूर : कामगारविरोधी चार श्रम संहितांच्या विरोधात आणि कामगारांच्या नोकरीला कायदेशीर सुरक्षा किमान वेतन, सामाजिक सुरक्षा वेतन मिळावे, यासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, कोल्हापूर शाखेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र, राज्य सरकारकडे केलेल्या विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले.
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचने देशव्यापी बंद पुकारला आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात सेंटर्स ऑफ इंडिया ट्रेड युनियनशी संलग्न असलेल्या कर्मचार्यांच्या 12 संघटनांनी मोर्चा काढला. टाऊन हॉल बागेतून मोर्चाची सुरुवात झाली. संघटनांचे लाल झेंडे हातात घेऊन मोर्चा टाऊन हॉल, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.
मोर्चात सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, सर्व श्रमिक संघ, वीज मंडळ कर्मचारी युनियन, एलआयसी कर्मचारी संघटना, घर कामगार संघटना, शालेय पोषण आहार, बांधकाम कामगार, रेशन बचाव कृती समिती, महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, इंजिनिअरिंग कामगार युनियन, दूध कर्मचारी संघटना, शेतकरी कामगार संघटना आदींचा समावेश होता.
यावेळी बोलताना कॉ. दिलीप पोवार म्हणाले, केंद्र सरकारची कामगारविरोधी धोरणे संपुष्टात आणण्यासाठी ही देशव्यापी एकजूट आहे. कॉ. सुभाष जाधव म्हणाले, 29 कामगार कायदे रद्द करून चार कामगार संहिता अणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर, राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक आणून लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात हा एल्गार आहे. कॉ. रघुनाथ कांबळे म्हणाले, असंघटित कामगारांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामगारविरोधी सरकारची भूमिका आहे. कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, कामगार कर्मचार्यांची एकजुटीने 29 कामगार कायदे लढून मिळविले आहेत. चार कामगार संहितेत रूपांतर करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे. हे सकरार व्यापार्यांचे सरकार आहे.
विजय धनवडे, सुधीर कोरे, सुरेश निकम, प्रसाद देसाई, अभिजित जाधव, नामेदव उरुणकर, संज्योत जयस्वाल, आकाश जाधव, सुकुमार तोडकर, सुहास सोळांकुरे, संदीप पाटील, श्रुतिका जैन, आप्पा कुलकर्णी, कॉ. सदाशिव निकम, भगवान पाटील, बाबासाहेब चौगुले उपस्थित होते.