Sangli Phata Uchgaon Flyover | सांगली फाटा-उचगाव उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला वेग

बोअर डाटा संकलनाचे काम युद्धपातळीवर : पावसाळ्यानंतर होणार प्रत्‍यक्ष कामास सुरुवात
कोल्हापूर : पिलर पूल उभारणीसाठी बोअर डाटा संकलनाचे काम सुरू आहे. (संग्रहित)
कोल्हापूर : पिलर पूल उभारणीसाठी बोअर डाटा संकलनाचे काम सुरू आहे. (संग्रहित)
Published on
Updated on

कोल्हापूर : महामार्गावर महापुराचे पाणी येऊ नये यासाठी मंजूर झालेल्‍या शिरोली-सांगली फाटा ते उचगाव या महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष वेग आला आहे. या कामाची वर्कऑर्डर झाली आहे. सुमारे ४०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत ३,७०० मीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पिलरच्या जागांचे सर्वेक्षण व मार्किंगचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

या कामासाठी ८ जून २०२६ रोजी वर्कऑर्डर दिली आहे. पंचगंगा नदीवरील विद्यमान पुलापेक्षा नवीन उड्डाणपूल सुमारे १८ ते २० फूट उंचीवरून जाणार असून, नदीच्या पूर्व बाजूस आणखी एक नवीन पूलही उभारण्यात येणार आहे. जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी १५ मीटर रुंदीचे स्वतंत्र दोन फ्लायओव्हर तसेच शिरोली-सांगली फाटा, गांधीनगर, तावडे हॉटेल परिसर आणि उचगाव येथे ७.५ मीटर रुंदीचे रॅम्प उभारले जाणार आहेत. सध्या महामार्गालगत बोअर डाटा घेण्‍यात येत असून, सुमारे १५ मीटर खोलीवर खडकाचा स्तर असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले आहे. बोअर डाटातील माहितीनुसार पिलरची रचना आणि बांधकाम साहित्य निश्चित केले जाणार आहे.

पावसाळ्यानंतर मुख्य पिलर उभारणीचे काम सुरू होणार असून, त्यावेळी वाहतूक सेवा मार्गावरून वळविण्यात येईल. २०१९ व २०२१ च्या महापुरानंतर या भागातील वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती लक्षात घेऊन या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.

दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश

सांगली फाटा ते उचगाव या मार्गावर भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्यात यावा यासाठी दै. ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठविला आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्‍य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून पिलर पुलाचे महत्त्व पटवून दिले आहे. या कामासाठी ठेकेदार निश्चित होऊन वर्कऑर्डर दिल्याने दैनिक ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश आले आहे.

महापुरातून होणार सुटका

विद्यमान पुलामुळे महापुराचे पाणी तुंबल्‍याने कोल्‍हापूर शहरास महापुराचा फटका बसला आहे. यापूर्वी आलेल्‍या महापुरात आठ दिवस महामार्ग बंद ठेवण्‍याची वेळ आली होती. नव्‍याने उभारण्‍यात येणार्‍या पिलर पुलांमुळे पाणी तुंबून न राहता निचरा होणार असल्‍याने महापुरापासून सुटका होण्‍यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news