

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील प्राचीन मणिकर्णिका कुंडासाठी टेंबलाई टेकडी आवारात दगड घडवण्याच्या कामाला वेग आला असून या कुंडाच्या तिसर्या बाजूचे काम लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. मंदिरातील नगारखाना नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर गरुड मंडपासाठी आवश्यक असलेल्या लाकडासाठी देवस्थान समितीच्या वतीने कर्नाटकात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिरातील प्राचीन मणिकर्णिका कुंडाच्या संवर्धनाचे काम गेल्या साडेतीन वषार्र्ंपासून सुरू आहे. 65 वर्षांपूर्वी हे कुंड मुजवले होते. या कुंडाचे संवर्धन करून नव्या रुपात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या कुंडाच्या दोन बाजूंचे काम झाले असून तिसरी बाजू संवर्धित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
नगारखान्याच्या लाकडी नक्षीकामाच्या कोनाड्यांची जोडणी नव्याने करण्यात आली आहे. नगारखान्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
मूळ गरुड मंडपाचे खांब खचल्याने हा मंडप उतरून घेण्यात आला होता. या मंडपासाठी पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील दांडेली येथून लाकूड आणले. या लाकडापासून खांब बनवण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी अजून लाकडाची गरज असल्याने कर्नाटकातील काही गावांमध्ये लाकडासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच मंडपाचे जुने लाकूड बाजूला ठेवले आहे. पुरातत्त्व विभागाकडून या जुन्या लाकडाच्या सुस्थितीत असण्याच्या तपासणीला हिरवा कंदील मिळाला तर त्याचा पुनर्वापर करण्याचा विचार आहे.
दिवाळीनंतर पुन्हा एकदा मणिकर्णिका कुंड, नगारखाना आणि गरुड मंडप यांच्या नूतनीकरणाच्या कामाची गती वाढवली आहे. या कामासाठी देवस्थान समितीच्या निधीतून 22 कोटी रुपये खर्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मणिकर्णिका कुंडाच्या संवर्धनासाठी 5 कोटी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. नगारखान्यासाठी साडेतीन कोटी तर गरुड मंडपासाठी 12 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.