

कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती उभा मारुती चौकामध्ये साकोली कॉर्नरकडे जाणार्या सांडपाण्याच्या मोठ्या चॅनेलचे काम मध्येच बंद झाल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र मैलायुक्त पाणी पसरले आहे. यामुळे साकोली कॉर्नरकडून मारुतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना या दूषित पाण्यातून पाय बुडवून जावे लागते आहे. हा चॅनेल मध्येच थांबण्याचे कारण काय? त्याला जबाबदार कोण? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. कारण, नागरिक स्वच्छतेसाठी कर भरतात आणि त्यांना चांगले रस्ते सोडा, जर मैलायुक्त पाण्यातून जावे लागत असेल, तर ती माणुसकीची थट्टा आहे.
स. म. लोहिया हायस्कूल, फिरंगाई परिसर, सरदार तालीम या भागातून येणारे पाणी गांधी मैदानात साचत होते. या पाण्याला बाहेर पडण्यासाठी वाव नव्हता. यासाठीच शासनाच्या नगरोत्थान योजनेतून फिरंगाई देवस्थान ते दुधाळी नाला असा 700 मीटर लांबीचा एक मोठा चॅनेल प्रस्तावित करण्यात आला होता. या 5 कोटी रुपयांच्या कामाला शासन मान्यता मिळाली. कामही सुरू झाले. फिरंगाई देवस्थानकडून न्यू कॉलेजमार्गे महात्मा गांधी पुतळ्याच्या पिछाडीच्या रस्त्यावरून हा चॅनेल उभा मारुती चौकापर्यंत आला. परंतु, उभा मारुती चौकातून एक वळण घेऊन या चॅनेलचे काम बंद पडले आहे. अद्याप त्याला दुधाळी नाल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 400 मीटरचे अंतर कापावयाचे आहे. या मार्गात अनेक चॅनेल त्याला मिळणार असून, साकोली कॉर्नर चौकात तासाभराच्या पावसातही साचणार्या गुडघाभर पाण्याला वाट मिळणार आहे. तरी या चॅनेलचे काम अचानक कसे थांबले? हा सवाल निर्माण झाला आहे.
याविषयी स्थानिक रहिवाशांतील कुजबुज गंभीर आहे. कोणाला त्यामध्ये हप्ता हवा आहे; पण त्याहीपेक्षा शासनाने निधी न पाठविल्याने कंत्राटदाराने हात आखडता घेतल्याचे यामागे हेही कारण आहे. 5 कोटींच्या निधीपैकी दीड कोटी रुपयांचा निधी महापालिकेत जमा होऊन कंत्राटदाराला अदाही झाला; पण पुढच्या निधीची प्रतीक्षा कंत्राटदारालाही आहे आणि महापालिकेलाही आहे. यासाठी पाठपुरावा कोण करणार? पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी आणि सांडपाणी यांचे कोणतेही काम थांबू नये, यासाठी मुंबई प्रांतीक महापालिका अधिनियमात कलम 5 (2) (2) अन्वये तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद प्रशासकांना दिली आहे. या कलमामागे कामाची निकड लक्षात घेतली आहे; मग अशी कामे थांबतात कशी? सांडपाण्यातून मार्ग काढणार्या नागरिकांच्या संवेदना संपुष्टात कशा आणल्या जातात, असा सवाल विचारला जात आहे.