

कोल्हापूर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेस बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण हिसडा मारुन लंपास केल्याच्या घटनेचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी संशयित कमल उर्फ कमु गोपीचंद शिंदे (वय ५५, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) हिला अटक केली. तिच्याकडून दीड ग्रॅम वजनाचा दागिना जप्त केला.
शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास फिर्यादी कस्तुरी शामराव अथनीकर (वय ६५, रा. कनाननगर परिसर) जिल्हा परिषद परिसरात चालत निघाल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी महिला त्यांच्याजवळ आल्या. पत्ता विचारण्याचा बहाणा करुन या दोघीही अथनीकर यांच्यासोबत चालत राहिल्या. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन लंपास करुन पलायन केले. शाहूपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील महिलांची माहिती गोळा केली. यावेळी स्टेशन रोडवरील एका फुटेजमध्ये दोन महिला मोटारीतून पसार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पुणे येथून शाहूपुरी पोलिसांनी कमल शिंदेहीला ताब्यात घेतले.