

पाचगाव : पाचगाव-गिरगाव रोडवरील घाट प्रारंभाजवळ शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास दोन महिलांना तीन युवकांनी अडविले. यावेळी चाकूचा धाक दाखवून एका महिलेचे दागिने लुटले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुनीता नारायण माने (रा. ओम साई कॉलनी), मंगल रंगराव पाटील (रा. डी. डी. शिंदे-सरकार गोडाऊन शेजारी) या महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी तीन युवक मोटारसायकलवरून पाचगावकडून येताना त्यांच्या द़ृष्टीस पडले. काही वेळात घाटात अन्य कोणीही नसल्याचे पाहून या युवकांनी या महिलांना अडविले. यावेळी चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिने काढून आपल्यास देण्यास सांगितले. याला या महिलांनी विरोध केला. तरीही विरोधाला न जुमानता सुनीता माने यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले.
त्याचवेळी मंगल पाटील यांच्या हातातील पाटल्या काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आरडाओरड केल्यामुळे फिरायला आलेली पुरुष मंडळी धावून आल्याने या युवकांनी मोटारसायकलवरून पाचगावच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच करवीरचे डी.वाय.एस.पी. सुजितकुमार क्षीरसागर, करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सहकार्यांसह भेट दिली. करवीर पोलिस, डी. बी. पथकाकडून सीसीटीव्हीच्या आधारे लुटारूंचा शोध सुरू आहे.