

कोल्हापूर : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जाब विचारणार्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कॉन्स्टेबलसोबत दुचाकीस्वाराने दमदाटी व उद्धट वर्तन केल्याचा प्रकार शहरातील मध्यवर्ती फोर्ड कॉर्नर परिसरात रविवारी सायंकाळी घडला. वाहतूक शाखेने संशयिताची दुचाकी हस्तगत केली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत संशयितावर गुन्हा दाखल झाला नव्हता.
मद्यधुंद अवस्थेत तीन तरुण दुचाकीवरून मध्यवर्ती चौकातून जात असताना ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाने त्यांना रोखले. महिला पोलिस आणि दुचाकीस्वार यांच्यात वादावादी झाली. दरम्यान दुचाकीवरील अन्य दोघे पसार झाले. तर एका तरुणाने महिला पोलिसांना दमदाटी करून त्यांच्याशी उद्धट वर्तन केले.
वादावादीमुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही वेळाने वाहतूक शाखेतील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोमवार पेठेतील रहिवासी असलेल्या संशयिताकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत संशयिताविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. भरचौकात महिला पोलिसाला दमदाटीचा प्रकार होवूनही शहर वाहतूक शाखा व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनी कडक कारवाई करण्याऐवजी मवाळ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.