Circuit Benches Orders | महिला वकिलास मारहाण; सीसीटीव्ही फुटेज सादर करा

सर्किट बेंचचे आदेश : मारहाणीची न्यायालयाने स्वत:हून घेतली दखल
Kolhapur Circuit Bench
Circuit Benches Orders | महिला वकिलास मारहाण; सीसीटीव्ही फुटेज सादर कराPudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जिल्हा न्यायालय परिसरात वकील महिलेस मारहाण झालेल्या घटनेची स्वतःहून दखल घेतली. तसेच, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनकडून महाराष्ट्र शासनविरुद्ध इतर अशी याचिका दाखल केली आहे. सर्किट बेंचमध्ये सोमवारी (दि. 9) दुपारी तातडीने या खटल्याची सुनावणी झाली.

यावेळी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना याप्रकरणी न्यायालयात बोलावण्यात आले. घटनेची संपूर्ण माहिती, पोलिस बंदोबस्त याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पेन ड्राईव्हमधून बुधवारी (दि. 11) दुपारी अडीच वाजेपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाच्या न्यायालय व्यवस्थापकांना दिले. पुढील सुनावणी बुधवारी आहे. सर्किट बेंचच्या डिव्हीजन बेंचचे न्यायमूर्ती माधव जामदार व प्रवीण पाटील यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

जिल्हा सत्र न्यायालयात 7 मार्चला कौटुंबिक वाद खटल्याची सुनावणी झाल्यानंतर टायपिंग रूम आणि माहिती कक्षासमोर एका विरोधी पक्षकार महिलेने वकील महिलेस मारहाण केली. याचा जिल्हा बार असोसिएशनने तीव— निषेध करून वकिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. याची गंभीर दखल सोमवारी स्वतः सर्किट बेंचच्या न्यायमूर्तींनी घेऊन ही याचिका दाखल करून घेतली. 9 मुद्द्यांमध्ये ही याचिका मांडली आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका गांभिर्याने घेतल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांना महिला वकिलांना संरक्षण देण्यात पोलिस कमी पडल्याची माहिती दिली. याचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त कशासाठी मागविला याकडे न्यायमूर्तींचे लक्ष वेधले. यावेळी न्यायमूर्ती यांनी पोलिस अधिक्षकांना बंदोबस्तासाठी किती पोलिस होते, याची विचारणा केली तेव्हा त्यांनी 42 पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले. खटल्यात अ‍ॅड. श्रीकृष्ण गणबावले, अ‍ॅड. स्वरूप कराडे, अ‍ॅड. तेजपाल इंगळे, अ‍ॅड. इम्तियाज हजारे, अ‍ॅड. प्रियांका राणे-पाटील, अ‍ॅड. शमिका पोटे-पाटणकर, अ‍ॅड. मनीषा सातपुते यांचेही सहकार्य लाभले. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. तेजस कापरे यांनी काम पाहिले.

खुद्द पोलिस अधीक्षक हजर

सर्किट बेंचमध्ये दुपारी चार वाजता सुनावणीसाठी खुद्द पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक संतोष डोके न्यायालयात हजर झाले.

यांना केले प्रतिवादी

कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि शाहूपुरी पोलिस निरीक्षक, राज्य सरकारसह गृह विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक.

यांनी केली जनहित याचिका दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसह कोल्हापूर जिल्हा बार असोसिशएन, उच्च न्यायालय बार असोसिएशन, कोल्हापूर बेंच आणि अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, कोल्हापूर हायकोर्ट बेंच अ‍ॅक्शन कमिटी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news