

नागाव: शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाने झडप घातल्याची धक्कादायक घटना टोप (ता. हातकणंगले) येथे घडली आहे. शेतातील कडबा उचलत असताना झालेल्या घोणस जातीच्या सापाच्या दंशाने सुनीता सर्जेराव भोसले (वय ५५) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोसले या नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.१८) सकाळी बिरदेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या 'भोसले खडी मळ्यातील' आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. शेतात साठवून ठेवलेला कडबा (चारा) त्या उचलत असताना, पेंढ्याखाली दबा धरून बसलेल्या विषारी घोणस सापाने त्यांच्या पायाला जोरात चावा घेतला.
साप चावल्याचे लक्षात येताच सुनीता यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळच काम करणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घोणसचे विष अत्यंत तीव्र असल्याने ते काही वेळातच त्यांच्या शरीरात वेगाने भिनले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
शेतात काम करताना, विशेषतः साठवलेला चारा किंवा लाकडे हलवताना शेतकऱ्यांनी संरक्षक बूट वापरणे आणि काठीचा वापर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.