

यड्राव : हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे कांडी मशिनमध्ये ओढणी अडकून गळ्याला फास लागून महिलेचा मृत्यू झाला. आक्कुबाई महादेव पोवार (वय ३६, रा.खोतवाडी) असे तिचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी १० च्या सुमारास घडली. याबाबत दिवाणजी संतोष राच्चाप्पा बेळगी (३९, रा. खोतवाडी) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
खोतवाडी येथे अनिल मुकरे यांचा साध्या यंत्रमागाचा कारखाना आहे. या कारखान्यात आक्कुबाई या दोन वर्षांपासून कांडी मशिनवर काम करतात. सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर आल्या होत्या. पावणेदहाच्या सुमारास कांडी मशिनमध्ये कांडी भरण्याचे काम करत असताना त्यांच्या ड्रेसची ओढणी मशिनमध्ये अडकली. त्या ओढणीचा गळ्यास गळफास बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची वर्दी दिवाणजीने पोलिसांना दिल्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले आहे तर दुसर्या मुलीचे लग्न ठरले आहे. मुलगा शिक्षण घेत आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आक्कुबाई यांच्यावर होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी मुलाने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.