

कोल्हापूर : कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून पतीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शर्मिला अमरसिंह शिंदे ( वय 35,रा. महालक्ष्मी पार्क, अंबाई टॅकजवळ कोल्हापूर, मूळ इस्लामपूर) यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. महिला दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होत्या. जेरबंद पती अमरसिंह मारुती शिंदे (37, रा. क्रांतिसिंह नानापाटील नगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जखमी महिलेच्या डोक्यात गंभीर इजा झाल्याने दोन दिवस त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शर्मिला यांच्या मृत्यूची बातमी समजताच वयोवृद्ध आई अलका मधुकर गावडे व दोन लहान मुलांनी रुग्णालय आवारात हंबरडा फोडला.
शासकीय नोकरदार असलेल्या शर्मिला यांचा पती रिकामटेकडा होता. पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाल्याने महिलेने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील तक्रारीनंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. शुक्रवारी (दि.25) सायंकाळी शर्मिला घरी जात असताना आयरेकर मळ्याजवळ त्यांना अडविले. दोघांत हमरी-तुमरी झाल्यानंतर पतीने दुचाकीच्या सायलन्सर लोखंडी पाईपने डोक्यात हल्ला केला. जखम खोलवर झाल्याने शर्मिला रस्त्यावरच कोसळल्या. जुना राजवाडा पोलिसांनी पती अमरसिंह शिंदे याला रविवारी सकाळी अटक केली होती.
जन्मदात्या मातेचा हल्ल्यात बळी गेल्याने आणि खुनाच्या गुन्ह्यात बाप अमरसिंह शिंदेला पोलिसांनी जेरबंद केल्याने दोन चिमुकल्या पोरांचा आधारच नाहीसा झाला आहे. चिमुरडी पोरं रुग्णालयात हंबरडा फोडत होती. मनाला चटका लावणार्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.