

Pothole Accident Radhanagari
गुडाळ : राधानगरी राज्यमार्गावर आणाजे येथे धोकादायक खड्ड्यात मोटरसायकल आदळल्याने मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. रादिया मेहबूब बक्षु (वय 43) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राधानगरी राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परिते-गैबी राज्यमार्गावर आवळी बुद्रुकपासून आणाजे गावाकडे येताना राम मंदिर ते आणाजे या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आवळी बुद्रुककडून चांगल्या रस्त्यावरून वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर येणारे खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकींचे अनेक अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सोमवारी सायंकाळी भोगावती येथे काम आटोपून कसबा तारळे येथील मेहबूब बक्षु हे पत्नी रादिया यांच्यासह दुचाकीवरून गावी परतत होते. रात्री साडेसातच्या सुमारास आणाजे हद्दीत आल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळली. यावेळी मागे बसलेल्या रादिया दुचाकीवरून उडून थेट रस्त्यावर आदळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने भोगावती येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परिते-गैबी रस्त्याचे मजबुतीकरण आणि फेरडांबरीकरणाचे काम दोन टप्प्यांत दोन ठेकेदारांकडून करण्यात आले आहे. यापैकी आणाजे ते गैबीदरम्यान करण्यात आलेले काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आणाजेचे माजी ग्रामपंचायत सदस्य डी. जी. टिपूगडे यांनी केला आहे.
रस्त्यावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत आणि रस्त्याच्या कामाच्या दर्जाची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.