

कोल्हापूर : रकमेचा चांगला मोबदला आणि कमी दराने सोने देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 30 लाखांची फसवणूक झाली. यात रोख 20 लाख 45 हजार रुपये आणि 9 लाख 15 हजार रुपयांचे 30 तोळे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी जयश्री मोहन माजगावकर (रा. बाळू मामा गल्ली, खतकर यांच्या घरी भाड्याने, सुभाषनगर) हिला अटक केली. अनिता नंदकुमार सूर्यवंशी (वय 58, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) यांनी तिच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सूर्यवंशी यांचा स्टेशनरीचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर 2022 ते 28 ऑगस्ट 2023 या कालावधीत शिवाजी पेठेत ही घटना घडली आहे. सूर्यवंशी व माजगावकर एकमेकांच्या ओळखीच्या आहेत. माजगावकर यांनी सूर्यवंशी यांच्याशी ओळख वाढवून त्यांच्या घरी येणे-जाणे वाढविले. त्यानंतर माजगावकर यांनी सूर्यवंशी यांना दुकानात भेटून माझा सोने खरेदीचा व्यवसाय आहे, 3 किलो सोने खरेदी करायचे आहे, थोडी रक्कम कमी पडत आहे, तुम्ही मला पैशाची मदत करा, दोन महिन्यात तुमचे पैसे परत देतो, त्या रकमेचा चांगला मोबदला देतो आणि सोनेही कमी दरामध्ये देतो, असे सांगितले. त्यानंतर माजगावकर व तिचा मुलगा ओंकार याने सूर्यवंशी यांच्याकडून 20 लाख 45 हजार, तसेच 9 लाख 15 हजारांचे 30 तोळे वजनाचे दागिने घेतले. काही कालावधीनंतर सूर्यवंशी यांनी रक्कम व सोन्याचे दागिने मागितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सूर्यवंशी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.