

कोल्हापूर : कर्जाच्या रकमेची परतफेड वेळेत न झाल्याचा गैरफायदा उठवत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील खासगी सावकार अमित कृष्णात सावंत याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. संशयिताने अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून पीडितेस ब्लॅकमेलिंग करत गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पीडित महिला आरोग्य सल्लागार आहे. गहाण घर सोडवण्यासाठी तिने 2023 मध्ये सावंतकडून 10 टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. काही महिने व्याजाची नियमित परतफेड केल्यानंतर आर्थिक ओढाताण सुरू झाली. कर्जाची रक्कम थकित राहिल्याचा फायदा घेत सावंतने महिलेवर अत्याचार केले.
जावयालाही बेदम मारहाण
सावकार सावंतची पैशांची हाव इतकी वाढली की, त्याने पीडितेच्या जावयाला सासूचे अश्लील व्हिडीओ दाखवले. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अखेर होणारा जाच आणि बदनामी असह्य झाल्याने पीडितेने गांधीनगर पोलिसात तक्रार दिली.