kolhapur Crime News | गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक

kolhapur Crime News |
kolhapur Crime News | गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर /मुरगूड : गर्दीचा फायदा घेऊन मुदाळ तिट्टा (ता. कागल) बसस्थानकातील प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. भिवरा पंडित लोंढे (५०, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे दागिने जप्त केले.

मुदाळ तिट्टा बसस्थानकात ११ सप्टेंबर रोजी दुपारी प्रवासी महिलेचे दागिने चोरीस गेले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत असताना ही चोरी रेकॉर्डवरील भिवरा लोंढे हिने केल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आली. ती चोरीतील दागिने विक्रीसाठी कळंबा भाजी मंडई परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे सापळा रचून तिला अटक केली. पोलिस अंमलदार संजय कुंभार, संदिप बेंद्रे, विजय इंगळे, सागर चौगुले, प्रज्ञा पाटील यांनी ही कारवाई केली.

हडलगेत वृद्धेच्या मानेला चाकू लावून ८५ हजारांचे सोन्याचे दागिने लुटले

नेसरी : हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे शेतात जनावरे चारणाऱ्या एका वृद्ध महिलेला खाली पाडून, मानेला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत सुमारे ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या झटापटीत फिर्यादी महिलेचा कान फाटून त्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी नेसरी पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडलगे येथील शांताबाई तुकाराम बुगडीकट्टीकर (६५) या सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हडलगे बंधाऱ्याजवळील पडीक जमिनीत जनावरे चरवत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून (एमएच १३ सीआर ६४६४) अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयाचा एकजण तेथे आला. त्यानेे शांताबाई यांना जबरदस्तीने खाली पाडले व ओरडलीस तर मर्डर करीन, अशी धमकी देत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली. संशयिताने त्यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि कानातील चार ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. कर्णफुले हिसकावून घेत असताना शांताबाई यांचा डावा कान फाटल्याने त्या रक्तबंबाळ होऊन जखमी झाल्या. दागिने लुटून संशयित दुचाकीवरून पसार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news