

कोल्हापूर : एस.टी. बसेसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील सराईत महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. प्रिया शरद चौगुले (वय ४०, रा. शिवाजी तालमीजवळ, हातकणंगले) असे महिलेचे नाव आहे. तिच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सातारा येथील प्रवासी महिला सुनीता दिनेश कुवडे इचलकरंजीला जाण्यासाठी सोमवारी (दि. १६) तावडे हॉटेलजवळ बसच्या प्रतीक्षेत होत्या. सायंकाळी सहा वाजता इचलकरंजीला जाणाऱ्या एस.टी.मध्ये बसत असताना संबंधित महिलेने गर्दीचा फायदा घेत पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र व रोकड लंपास केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे महिलेचे नाव निष्पन्न केले. संशयित महिला अतिग्रे ता. हातकणंगले) येथील एका हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने तिला ताब्यात घेतले.