

कोल्हापूर : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करून हातोहात पसार होणाऱ्या राजेंद्रनगर येथील महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. पिंकी विशाल सकट (वय ४५, रा. स्वांतत्रसैनिक वसाहत, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. संशयित महिलेकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राजारामपुरी येथील जनता बझार चौक परिसरात दि. ३ ऑगस्टला प्रवासी महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत संशयित महिलेने पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राजारामपुरीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामार्फत गुन्ह्याचा तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार संदीप सावंत, सत्यजित सावंत यांना संशयित महिलेची माहिती मिळाली. पथकाने महिलेवर पाळत ठेवली होती. चोरीच्या गुन्ह्यातील दागिने विक्रीसाठी संशयित महिला सायबर चौकात येणार असल्याची खबर मिळताच पथकाने तिला ताब्यात घेतले. झडतीत ५ लाख ६ हजार रुपये किमतीचे दागिने आढळून आले. संशयित महिलेकडून चोरीचे अन्य गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.