

महागाव : हरळी खुर्द येथील वड्याजवळील शेतामध्ये रायाप्पा मासेट्टी कट्टीकर यांच्या बकर्यांचा कळप बसला आहे. या ठिकाणी जाळीत ठेवलेल्या कोकरांवर लांडग्याने हल्ला करत 9 कोकरांचा फडशा पाडला. रायाप्पा व त्याच्या कुटुंबाने बकर्यांच्या पिल्लांना दूध पाजून नऊ पिल्ले शेतातच जाळी मारून ठेवली होती. उर्वरित सर्व मोठी बकरी घेऊन ते रानात चारावयास गेले.
दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान जंगलातील लांडग्यांनी पिल्लांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जवळपास नऊ कोकरांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित आठ बकरी गंभीर जखमी झाली. रायाप्पा कट्टीकर यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. सकाळी कॉलेजला गेलेला रायाप्पा यांचा मुलगा उमेश बकरी बसलेल्या ठिकाणी आला असताना त्याला लांडगे पिल्लांचे लचके तोडत असल्याचे दिसले. तो ओरडत धावतच बकर्यांच्या ठिकाणी गेला असता आवाज ऐकून लांडग्याने पळ काढला.