

कोडोली : विधानसभेच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघांतील शहापूर (ता. पन्हाळा) भानामतीचा प्रकार घडला. येथील विद्यामंदिर शाळेच्या आवारात निवडणूक केंद्राजवळ मतदानाचे तीन बॅलेट फलक, शिवसेना पक्षाचे मशाल चिन्ह असलेला मफलर, भंडारा, पांढरी मोहरी, बिब्बे असे साहित्य आढळून आले. अघोरी प्रकारातून मतदारांना भीती निर्माण व्हावी, असे कृत्य केल्याप्रकरणी सुधीर शिवाजी थोरात (रा. सरुड) व प्रणव प्रकाश पाटील (रा. चरण, ता. शाहूवाडी) या दोघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुधीर व प्रणव यांना हे साहित्य ठेवताना शहापूर गावातील राहुल हंबीराव पाटील यांनी रंगेहाथ पकडले. दोघांना कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या विरोधी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि जादूटोणा अधिनियम 2013 नुसार गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.