Gokul Chairman Election | गोकुळ अध्‍यक्षपदाची निवडणूक महायुती लढणार?

 Gokul Chairman Election |
Gokul Chairman Election | गोकुळ अध्‍यक्षपदाची निवडणूक महायुती लढणार?
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ ‘गोकुळ’ची १० नोव्‍हेंबरला होणारी अध्‍यक्षपदाची निवडणूक महायुती लढण्‍याच्‍या तयारीत आहे. अध्‍यक्षपदासाठी उमेदवार देण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍याचे समजते. राष्‍ट्रवादी अथवा शिवसेनेचा संचालक अध्‍यक्ष निवडीच्‍या मैदानात असण्‍याची शक्‍यता असल्‍याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून देण्‍यात आली आहे.

गोकुळची अध्‍यक्ष निवड कोरमच्‍या संख्‍येत अडकली आहे. समविचारी आघाडीकडे १३ संचालकांचे बहुमत असूनही कोरमची संख्‍या पूर्ण न झाल्‍यामुळे ते सत्तेपासून दूर राहिले आहेत; तर महायुतीकडेही १२ संचालक असल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडेही कोरमची संख्‍या नाही. त्‍यामुळे दोन्‍ही आघाड्या स्‍वतंत्रपणे सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशी सध्‍याची परिस्‍थिती आहे. सोमवारी न्‍यायालयाने १० नाव्‍हेंबरला अध्‍यक्ष निवडीची सभा घेण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे अध्‍यक्ष निवडीवरून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महायुतीच्‍या १२ संचालकांनी गोकुळ अध्‍यक्ष निवडीच्‍या मागील सभेकडे पाठ फिरविली. त्‍यामुळे कोरमअभावी सभा तहकूब झाल्‍याने अध्‍यक्ष निवड होऊ शकली नाही. मात्र आता १० नोव्‍हेंबरला होणार्‍या अध्‍यक्ष निवडीच्‍या मैदानात उतरण्‍याचा निर्णय महायुतीच्या नेत्‍यांनी घेतल्‍याचे समजते. याबाबत गुप्‍तपणे खलबतेही सुरू आहेत. त्‍यामुळे अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत आता राजकीय रंगत वाढणार आहे.

दोन दिवस अगोदर ठरणार रणनीती

अध्‍यक्षपदाची निवडणूक लढवायची हे महायुतीचे जवळपास निश्‍चित झाले आहे. अध्‍यक्ष निवडीच्‍या दोन दिवस अगोदर महायुतीच्या नेत्‍यांची बैठक होण्‍याची शक्‍यता आहे. या बैठकीमध्‍ये उमेदवाराचे नाव निश्‍चित होणार असून रणनीती ठरणार असल्‍याचे समजते.

महायुतीच्‍या एंट्रीने वाढली धाकधूक

मंत्री मुश्रीफ यांनी शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्‍यक्ष करण्‍याची जबाबदारी आम्‍हालाच घ्‍यावी लागेल, असे सूचक वक्‍तव्‍य केले होते. त्‍यातच आता महायुतीकडून अध्‍यक्षपदाची निवडणूकही लढवली जाण्‍याची शक्‍यता आहे. अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत महायुतीने एंट्री केल्‍याने धाकधूक वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.