

कोल्हापूर : राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे काम सर्वात वेगवान सुरू आहे. याच वेगाच्या बळावर शेंडा पार्क येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. सीपीआरमध्ये जुने काहीच ठेवणार नाही. सगळे अत्याधुनिक करणार असून, राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे रेकॉर्डब्रेक काम सुरू आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी सीपीआरमधील कामे फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
सीपीआरमधील एमआरआय, सीटी स्कॅन, मॅमोग्राफी, सोनोग्राफी उपकरणे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील ऑडिटोरियमच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआर येथील रुग्णांसाठी एमआरआय, सीटी स्कॅनची सुविधा मोफत व माफक दरात उपलब्ध असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमआरआयची मागणी होती. ती आज पूर्ण झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधांसाठीही 2,500 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. त्यातूनही अनेक कामे होणार आहेत.
आमदार अमल महाडिक म्हणाले, सीपीआर येथील आरोग्यसेवेला दिग्विजय खानविलकर यांनी बळकटी दिली. आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, सीपीआर अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरले आहे. कामातून मंत्री मुश्रीफ यांनी आपली छाप उमटवली आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, डॉ. संजय देसाई, डॉ. स्वेनिल शहा, महेश सावंत, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले उपस्थित होते. स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे यांनी केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी मानले.