Kolhapur police commissionerate | सर्किट बेंच झाले, आता प्रतीक्षा कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाची

पोलिस महासंचालकांकडून अपेक्षा; 1985 पासून प्रस्ताव लालफितीत
Kolhapur police commissionerate | सर्किट बेंच झाले, आता प्रतीक्षा कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाची
Kolhapur police commissionerate | सर्किट बेंच झाले, आता प्रतीक्षा कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाची
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचा वाढता आलेख, लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प मनुष्यबळामुळे कोल्हापूर पोलिस दलावर अमर्याद पडणारा ताण लक्षात घेता कोल्हापूरला पोलिस आयुक्तालयाची गरज आहे. 1985 पासून कोल्हापूरचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. प्रदीर्घ लोकलढ्यानंतर सर्किट बेंच सुरू झाले. आता कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय होणार का, पोलिस महासंचालक सदानंद दाते प्रथमच कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. कोल्हापूरकरांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

व्यापारपेठा, औद्यौगिकीकरणामुळे स्थानिक, परप्रांतीय कामगारांच्या संख्येत कैकपटीने वाढ झाली आहे. शिवाय, संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारनाम्यांचा टक्का वाढला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, लूटमारीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही सातत्याने भेडसावतो आहे. गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कोल्हापूरला पोलिस आयुक्तालयाची गरज निर्माण झाली आहे.

पोलिस आयुक्तालय झाल्यास गुन्हेगारी टोळ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे शक्य होईल. पोलिस आयुक्तांच्या अधिकारामुळे गुंडांच्या टोळ्यांचा बीमोड होईल, माफियाराजवर पोलिस यंत्रणेचा वचक राहू शकेल. कोल्हापूर पोलिस आयुक्तालय झाल्यास अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होईल; शिवाय राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी पोलिस ठाण्यांचे विभाजन होऊन आणखी चार ते पाच पोलिस ठाण्यांची नव्याने निर्मिती होईल. इचलकरंजी, कबनूर, यड्राव परिसरात स्वतंत्र पोलिस ठाणी कार्यरत होऊ शकतील.

प्रशासकीय रचना

पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त (प्रशासन, कल्याण, वाहतूक), उपायुक्त (गुन्हे, विशेष शाखा), पोलिस उपायुक्त, शहर आयुक्त (1) अंतर्गत लक्ष्मीपुरी, राजवाडा, करवीर पोलिस ठाणे, सहायक आयुक्त (2) अंतर्गत शाहूपुरी, राजारामपुरी, शिरोली पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त (3) इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, गोकुळ शिरगाव.

पोलिस आयुक्तालयामध्ये समाविष्ट होणारी पोलिस ठाणी

लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, राजवाडा, इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, गांधीनगर, शिरोली, करवीर, गोकुळ शिरगाव, हातकणंगले, हुपरी पोलिस ठाण्यांचा समावेश राहील.

कोल्हापूर ग्रामीण विभाग

कोल्हापूर ग्रामीण विभागात गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, आजरा, भुदरगड, वडगाव, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंंदवाड, शाहूवाडी, पन्हाळा, कोडोली, राधानगरी, गगनबावडा, कळे, इस्पुर्लीचा समावेश राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news