Hasan Mushrif | महापौर कालावधीबाबत चर्चा करणार : मुश्रीफ

प्रशासक काळातील गोकुळच्या तोट्याची आवश्यकता असल्यास चौकशी
Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ(File photo)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षे की दहा महिने याबाबत महापौर रुपाराणी निकम आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. गोकुळमध्ये प्रशासक काळात झालेल्या तोट्याची आवश्यकता असल्यास चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघात प्रशासकांच्या काळात झालेल्या तोट्याची कारणे नवे अध्यक्ष राजेश पाटील आणि संचालक मंडळ शोधून काढेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एआयच्या मदतीने स्वतःच्या माळरानावरील शेतात एकरी ९० टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल फोन करून अभिनंदन केले, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

कागल आणि करवीर तालुक्यात पिकांना गरज असताना पावसाचा खंड पडल्याने पाहणी झाली असून, या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा केला जाईल, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांची वसुली करण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी एजंटांचा वापर थांबवावा, अन्यथा फौजदारी कारवाई होईल, अशा महसूलमंत्र्यांच्या कडक सूचना आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट एनडीएत सामील होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी स्वर्गीय अजितदादा पवार हयात असताना विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होती, मात्र त्यांच्या निधनानंतर ती थांबली. सुरुवातीला आमच्या पक्षाने आणि नंतर शरद पवार गटानेही विलीनीकरण होणार नसल्याची भूमिका घेतली होती.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा मुश्रीफ यांनी तीव्र निषेध केला. ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मंत्री नरेंद्र झिरवाळ यांचा शब्दप्रयोग टाळायला हवा होता, असेही ते म्हणाले. आमदार शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी उत्तर दिल्याचे सांगत त्यांनी बोलण्याचे टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.